मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची धुवांधार एन्ट्री!
अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार


मुंबई, दि. ९ (प्रतिनिधी) :- ​राज्यातील विविध भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असून वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. अमरावती शहरात आलेल्या तीव्र वादळामुळे मुख्य रस्त्यांवरील २० पेक्षा जास्त झाडे उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती, जी सुरळीत करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन सध्या युद्धपातळीवर काम करत आहे. दुसरीकडे, जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पावसाचे दमदार आगमन झाल्याने उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांमध्ये आगामी शेतीकामांसाठी उत्साहाचे वातावरण आहे. सोलापूरच्या करमाळा शहरात सलग दुसऱ्या दिवशीही ढगाळ हवामानासह मुसळधार पाऊस सुरू असल्याने रस्त्यांवर पाणी साचले आहे. नागपूरमध्ये दिवसभराच्या कडक उन्हाच्या चटक्यानंतर संध्याकाळी हलक्या सरी कोसळल्या, ज्यामुळे तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी उकाडा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

​बीड जिल्ह्यातही सलग दोन दिवस वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वातावरणात छान गारवा निर्माण झाला असून, घटत चाललेल्या पाणी पातळीच्या चिंतेतून नागरिकांना थोडी सुटका मिळाली आहे. भंडारा जिल्ह्यात दुपारच्या सुमारास सुरू झालेल्या रिमझिम पावसामुळे तापमानात घट झाली असली, तरी रब्बी धान पिकाची कापणी अंतिम टप्प्यात असल्याने जोरदार पाऊस झाल्यास पिकांचे नुकसान होईल या भीतीने येथील शेतकरी चिंतेत पडला आहे. धाराशिव जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच झालेल्या मुसळधार पावसामुळे भूम, परंडा, कळंब, वाशी आणि उमरगा परिसरातील नदी-नाल्यांना पूर आला असून तेरणा नदी प्रवाहित झाली आहे.

​वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यांतर्गत येणाऱ्या महाबळा परिसरात दुपारी अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे घरांची व गोठ्यांची टीनपत्रे उडून गेली, तसेच जनावरांचा चारा भिजल्याने पशुपालकांचे हाल झाले असून केळीच्या बागांचेही अतोनात नुकसान झाले आहे. सोलापूरच्या माढा तालुक्यातील टेंभुर्णी, उपळाई बुद्रूक आणि चिंचोली भुताष्टे या ग्रामीण भागात झालेल्या दमदार पावसामुळे पाण्याअभावी सुकत चाललेल्या पिकांना नवजीवन मिळाले आहे. तसेच, अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव परिसराला पावसाने चांगलेच झोडपून काढले असून, आठवड्यातून दुसऱ्यांदा झालेल्या या मुसळधार पावसामुळे शेतीची मशागत पूर्ण केलेले शेतकरी आता मोठ्या आशेने खरीप हंगामाच्या पेरणीच्या तयारीला लागले आहेत.

Comments

Popular posts from this blog