अलिबागच्या रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा
३८ हजारांनी भरलेले पाकीट मुंबईच्या पर्यटकाला केले परत
अलिबाग, दि. २८ (स्वप्निल नाईक) :- आजच्या धकाधकीच्या आणि वाढत्या महागाईच्या काळात जिथे माणूस स्वतःच्या फायद्याचा विचार करतो, तिथे अलिबागच्या एका रिक्षा चालकाने प्रामाणिकपणाचा एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. अलिबाग शहरातील प्राजक्ता नाका रिक्षा स्टँडवर व्यवसाय करणारे रिक्षा चालक मित्र श्री. आशीर्वाद यशवंत पाटील (रा. मुळे, अलिबाग) यांनी एका पर्यटकाचे हरवलेले, रोकड आणि महत्त्वाच्या कागदपत्रांनी भरलेले पाकीट सुखरूप परत करून माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, शुक्रवारी दि. २७ मार्च २०२६ रोजी श्री. आशीर्वाद पाटील हे अलिबागहून नागांव येथे प्रवासी घेऊन गेले होते. प्रवाशांना सोडून परत येत असताना रायवाडी-नागांव दरम्यान त्यांना रस्त्यावर एक पाकीट पडलेले दिसले. पाटील यांनी ते पाकीट उचलून त्याची पाहणी केली असता, त्यामध्ये ३८ हजार रुपयांची रोख रक्कम आणि काही महत्त्वाची कार्डे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पाकिटात असलेल्या मतदार ओळखपत्रावरून ते पाकीट सांताक्रूझ, मुंबई येथील रहिवासी असलेले श्री. शिरीष सदानंद सिनकर यांचे असल्याचे समजले.
पाटील यांनी केवळ पाकीट सापडले म्हणून गप्प न बसता, त्या पाकिटाच्या मालकाचा शोध घेण्याचे ठरवले. त्यांनी सोशल मीडियाचा कौशल्याने वापर करत फेसबुकच्या माध्यमातून श्री. सिनकर यांचा संपर्क क्रमांक मिळवला आणि त्यांच्याशी त्वरित संवाद साधला. आपले पाकीट सुरक्षित असल्याचे समजताच सिनकर कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला.
आज दि. २८ मार्च २०२६ रोजी श्री. शिरीष सिनकर यांनी अलिबाग येथे येऊन आशीर्वाद पाटील यांची भेट घेतली. यावेळी पाटील यांनी सर्व रोकड आणि कागदपत्रांसह ते पाकीट सिनकर यांच्या स्वाधीन केले. आपली कष्टाची कमाई आणि महत्त्वाची कागदपत्रे परत मिळाल्याने सिनकर दांपत्य भावूक झाले. त्यांनी आशीर्वाद पाटील यांच्या प्रामाणिकपणाचे भरभरून कौतुक केले आणि कृतज्ञता म्हणून त्यांना योग्य ते बक्षीस व मिठाई देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला.
अलिबागच्या पर्यटन क्षेत्रात अशा प्रामाणिक रिक्षा चालकांमुळे शहराची मान उंचावली असून, श्री. आशीर्वाद पाटील यांच्या या कृत्याचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. 'माणुसकी अजूनही जिवंत आहे' याची प्रचिती या घटनेतून पुन्हा एकदा आली आहे.

Comments
Post a Comment