कोलाड हद्दीत सुतारवाडी येथे घरफोडी!
५८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला
कोलाड-रायगड, दि. ५ (प्रतिनिधी) :- कोलाड येथील सुतारवाडी परिसरामध्ये एक घरफोडीची घटना उघडकीस आली असून, अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत सुमारे ५८,४५० रुपयांचा ऐवज लांबवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहा तालुक्यातील मौजे सुतारवाडी येथील फिर्यादी यांचे घर काही काळासाठी बंद असताना ही चोरी झाली. ३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३:३० वाजेपासून ते ४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३:३० वाजेच्या दरम्यानच्या काळात अज्ञाताने या बंद घराला लक्ष्य केले. चोरट्याने किंवा चोरट्यांनी फिर्यादी यांच्या बंद घराच्या मागील बाजूचा मुख्य दरवाजा तसेच स्टोअर रूमच्या दरवाजाचे कडी-कोयंडे पहारीच्या साहाय्याने उचकटले. त्यानंतर आत प्रवेश करून फिर्यादी यांच्या संमतीशिवाय घरातील ५८,४५० रुपये रोख व इतर मौल्यवान माल चोरून नेला.
घरमालक परत आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत 'भारतीय न्याय संहिता २०२३' च्या कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३३१(४) अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर १०८/२०२० अन्वये नोंद केला आहे. या घरफोडीच्या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत भोजकर हे करत असून, परिसरातील संशयितांची चौकशी आणि आरोपींचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे.

Comments
Post a Comment