मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨

खड्ड्यात पडून माणूस मेल्यावर ठेकेदार उपाययोजना करणार का? 

कोलाडमध्ये पत्रकारांनी विचारला पोलीस प्रशासनाला जाब!

 पोलिसांकडे मांडल्या लोकसमस्या 


कोलाड-रायगड, दि. ४ ऑगस्ट (प्रतिनिधी) :- ​मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड आंबेवाडी नाक्यावरील उड्डाणपुलाखाली पडलेले भले मोठे खड्डे आणि त्यामुळे वाढणाऱ्या अपघातांना रोखण्यासाठी सोमवारी, ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी पत्रकारांनी कोलाड पोलीस स्टेशनला भेट दिली. रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष डॉ. श्याम लोखंडे यांच्यासह भिवा पवार, विश्वास निकम, अजय परदेसी, तेजपाल जैन आणि नंदकुमार कळमकर या पत्रकारांच्या शिष्टमंडळाने सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फार्णे यांची भेट घेऊन येथील नागरिकांचा संताप आणि संबंधित ठेकेदाराच्या निकृष्ट व मनमानी कारभाराबाबत तीव्र शब्दांत जाब विचारला.









​या बैठकीदरम्यान पत्रकारांनी उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडची दुरावस्था, तुटलेली गटारे आणि त्यांच्या झाकणांच्या दुरुस्तीचा प्रश्न प्राधान्याने मांडला. हा रहदारीचा मुख्य मार्ग असल्याने ठेकेदाराने येत्या एक-दोन दिवसांत तो सुस्थितीत आणावा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. याशिवाय, तिसे तळवली ते खांब सुकेळी हद्दीपर्यंतच्या मार्गाची झालेली दयनीय अवस्था, खांब येथील सर्व्हिस रोडचा प्रश्न तसेच खांब येथील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रा. ग. पोटफोडे विद्यालयासमोर आणि द. ग. तटकरे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, कोलाडकडे जाणाऱ्या मार्गावर अपघातांची शक्यता लक्षात घेता तातडीने झेब्रा क्रॉसिंग व गतिरोधक बसवण्याची मागणी करण्यात आली.
​त्याचप्रमाणे कोलाड परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधांचा अभाव आणि सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची उभारणी यांसारख्या सर्वसामान्य जनतेच्या विविध व्यथा मांडून त्यावर पोलीस प्रशासनाशी सविस्तर चर्चा करण्यात आली. पत्रकारांनी मांडलेल्या या सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत, येत्या दोन दिवसांत कोलाड उड्डाणपूल व सर्व्हिस रोडच्या दुरुस्तीसाठी संबंधित ठेकेदाराशी तातडीने संपर्क साधून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फार्णे यांनी दिले. तसेच विविध ठिकाणचे खड्डे, गटारांवरील तुटलेली झाकणे, उड्डाणपुलाचे कठडे आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा अभाव दूर करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी उपाययोजना केल्या जातील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog