महाडमध्ये घरफोडी!
बंद घराच्या खिडकीचे लोखंडी अँगल उचकटून सोन्याचे दागिने लंपास
महाड-रायगड, दि. १८ (प्रतिनिधी) :- महाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाडवली कोंड येथे एक धक्कादायक घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी हे आपल्या राहत्या घरी नसण्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लाडवली कोंड, तालुका महाड येथे राहणारे फिर्यादी हे काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. घर बंद असल्याचे पाहून अज्ञात आरोपीने चोरीच्या इराद्याने घराचा मागचा भाग गाठला. त्यानंतर घराच्या खिडकीचे लोखंडी अँगल कशाच्या तरी सहाय्याने उचकटून, त्या खिडकीवाटे चोरट्याने घरामध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश केला. घरात शिरल्यानंतर चोरट्याने थेट बेडरूम गाठली आणि तेथील लोखंडी कपाटाचे लॉकर उघडून, त्यात ठेवलेले मौल्यवान सोन्याचे दागिने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आणि लबाडीच्या उद्देशाने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय चोरून नेले.
फिर्यादी जेव्हा घरी परतले, तेव्हा त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून, महाड शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक १०१/२०२६ नुसार, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या चोरीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार पवार हे करीत आहेत. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून चोरट्याचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत.

Comments
Post a Comment