सातारा जिल्ह्यात शेती पंपाच्या कॉपर वायर आणि डी.पी. चोरणारी टोळी गजाआड; ५ आरोपींना अटक
बोरगाव पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कामगिरी; २० लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त तर २६ गुन्ह्यांची उकल
सातारा, दि. १८ (प्रतिनिधी) :- सातारा जिल्ह्यातील बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दोन महिन्यांपासून शेती पंपाच्या कॉपर वायर आणि डी.पी. (ट्रान्सफॉर्मर) चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. या वारंवार घडणाऱ्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेत सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि पोलीस उपविभागीय अधिकारी राजीव नवले यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके व बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांना अज्ञात चोरांचा शोध घेऊन तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
या आदेशानुसार बोरगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, पोलीस उपनिरीक्षक एम. ई. पाटील, बोरगाव डी. बी. पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरी झालेल्या विविध घटनास्थळांना वारंवार भेटी देऊन सखोल तपास सुरू केला. पोलिसांनी आपल्या गोपनीय बातमीदारांना सतर्क केले, तसेच सायबर विभागाच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण करून माहिती गोळा केली. या मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून हर्षद सुनील जाधव (वय २३, रा. सासपडे, ता. जि. सातारा), स्वप्नील संजय मगर (वय २१, रा. ढोरोशी, ता. पाटण, जि. सातारा), विकास वाल्मिक कदम (वय २३, रा. मरळोशी, ता. पाटण, जि. सातारा), विवेक विजय लादे (वय २३, रा. सासपडे, ता. जि. सातारा) आणि शेखर चंद्रकांत सावंत (रा. निवडे, ता. पाटण, जि. सातारा) या पाच जणांना शिताफीने ताब्यात घेतले.
अटक केलेल्या आरोपींकडे सखोल आणि कौशल्याने तपास केला असता, त्यांनी मागील काही महिन्यांपासून फरार असलेला मुख्य आरोपी सागर चंद्रकांत मोरे (रा. भुडकेवाडी, ता. पाटण, जि. सातारा) आणि त्याच्या इतर दोन ते तीन अनोळखी साथीदारांच्या मदतीने संघटितपणे बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ डी.पी. आणि ४ ठिकाणी शेती पंपाच्या कॉपर वायरची चोरी केल्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे शाखा सातारा व बोरगाव डी.बी. पथकाने आरोपींना विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता, या टोळीने बोरगाव, कोरेगाव, सातारा तालुका, सातारा शहर, भुईंज आणि उंब्रज पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण २६ ठिकाणी कॉपर वायर आणि डी.पी. चोरी केल्याचे उघड झाले.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली १ पिकअप गाडी, ४ मोटरसायकली, ५ मोबाईल, चोरी करण्यासाठी लागणारे साहित्य, चोरीचा मुद्देमाल आणि रोख रक्कम असा एकूण २०,२२,४८२/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या यशस्वी कामगिरीमुळे बोरगाव पोलीस ठाण्यातील ५ गुन्हे, कोरेगाव पोलीस ठाण्यातील १० गुन्हे, सातारा तालुका पोलीस ठाण्यातील ५ गुन्हे, सातारा शहर पोलीस ठाण्यातील २ गुन्हे, भुईंज पोलीस ठाण्यातील ३ गुन्हे आणि उंब्रज पोलीस ठाण्यातील १ गुन्हासह एकूण २६ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
सदरची उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, पोलीस उपविभागीय अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, बोरगावचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, पोलीस उपनिरीक्षक एम. ई. पाटील, एस. एम. बसवंत आणि डी. बी. पथकातील अंमलदार प्रवीण शिंदे, रफिक काझी, निलेश गायकवाड, दीपककुमार मांडवे, विजय म्हेत्रे, संजय खाडे, सुनील कर्ण, प्रवीण नावडकर, रफिक शेख, नंदकुमार कचरे, प्रशांत चव्हाण, जगदीश कणसे, सुमीत साळुंखे, ज्ञानेश ढाणे, विशाल जाधव, समाधान जाधव, केतन जाधव यांनी केली. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर, इसाक मुलानी, साबीर मुलानी, अमोल माने, जयवंत खांडके, अजित कर्णे, अजय जाधव, प्रवीण कांबळे, लक्ष्मण जगधने, अमित झेंडे, स्वप्नील धोंड, धीरज महाडीक आणि संकेत निकम यांनी या कामगिरीत महत्त्वाचे योगदान दिले. सद्यस्थितीत या पाचही आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एम. बसवंत करत आहेत.

Comments
Post a Comment