लांजा येथील काजू फॅक्टरीतील चोरीचा रत्नागिरी पोलिसांकडून पर्दाफाश!
दोन आरोपींसह साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी, दि. ७ (प्रतिनिधी) :- लांजा येथील एका नामांकित काजू फॅक्टरीमध्ये अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करून मोठ्या प्रमाणावर काजूगर चोरून नेल्याची खळबळजनक घटना नुकतीच घडली होती. या चोरीच्या गुन्ह्यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून या संपूर्ण गुन्ह्याचा समांतर आणि सखोल तपास रत्नागिरी पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे (LCB) सोपवण्यात आला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अत्यंत गतीने आणि कौशल्यपूर्ण रीतीने या प्रकरणाचा तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलीस पथकाला आपल्या खासगी सूत्रांकडून अत्यंत गोपनीय माहिती मिळाली. या गोपनीय माहितीसह अत्याधुनिक तांत्रिक विश्लेषणाचा (Technical Investigation) कौशल्याने वापर करून पोलिसांनी संशयितांचा माग काढला. या तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या भक्कम आधारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अत्यंत शिताफीने सापळा रचून दोन संशयित इसमांना ताब्यात घेतले. या आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी या चोरीची कबुली दिली.
पोलीस पथकाने कारवाईदरम्यान या दोन्ही आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वाहनासह काजूगर आणि इतर साहित्य असा एकूण ९,४१,८७९/- (नऊ लाख एककेचाळीस हजार आठशे एकोणऐंशी) रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. हा संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून आरोपींवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
रत्नागिरी पोलीस दलाने अत्यंत अल्पवधीत या चोरीचा छडा लावत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. ही धडक कारवाई रत्नागिरीचे माननीय पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से) यांच्या सक्षम आणि योग्य मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे आणि त्यांच्या संपूर्ण पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे. पोलिसांच्या या तत्पर आणि यशस्वी कामगिरीमुळे लांजा परिसरातील व्यापारी वर्गातून आणि नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Comments
Post a Comment