माणगांवच्या छत्रपती करिअर अकॅडमीच्या चार विद्यार्थ्यांची इंडियन आर्मीमध्ये निवड!
गुलाल उधळताच सैनिक झालेल्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले
माणगांव-रायगड, दि. २ (प्रतिनिधी) :- जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुणांनी पुन्हा एकदा यशोशिखर गाठले असून रायगड जिल्ह्यातील माणगांव येथील छत्रपती करिअर अकॅडमीच्या चार विद्यार्थ्यांची थेट इंडियन आर्मी (भारतीय सैन्यदल) मध्ये निवड झाली आहे. यामध्ये माणगांव तालुक्यातील चिंचवली वाडी-गोरेगाव येथील रहिवासी असलेला जय निलेश जैसवाल, वावे गावचा रोहन सतिश मारणे, मोर्बा येथील क्रितीश शिवदास जाधव आणि रेपोली गावचा रहिवासी असलेला सारंग शंकर यादव या चार तरुणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे चारही तरुण अत्यंत गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील असून त्यांनी बिकट परिस्थितीवर मात करत हे दैदिप्यमान यश संपादन केले आहे आणि भारतीय सैन्यदलात आपले स्थान निश्चित केले आहे.
माणगांव येथील छत्रपती करिअर अकॅडमीमध्ये या सर्व विद्यार्थ्यांनी सैन्यदलात भरती होण्यासाठी आवश्यक असणारे खडतर शारीरिक आणि बौद्धिक पूर्व-प्रशिक्षण घेतले होते. अकॅडमीच्या संस्थापिका सौ. माधुरी निवास साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या तरुणांनी देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून अहोरात्र मेहनत घेतली. त्यांच्या या कष्टाचे चीज झाले असून या चौघांचीही इंडियन आर्मीसाठी निवड झाली आहे. एकाच वेळी अकॅडमीच्या चार गरीब कुटुंबातील मुलांनी भारतीय सैन्यात थेट प्रवेश मिळवल्याची बातमी समजताच संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून या नवनियुक्त सैनिकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या अभूतपूर्व यशानंतर छत्रपती करिअर अकॅडमीच्या वतीने या नवनियुक्त सैनिकांचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात संस्थेच्या वतीने विजयी विद्यार्थ्यांवर गुलालाची उधळण करण्यात आली आणि त्यांना पुष्पहार घालून सन्मानित करण्यात आले. अनेक दिवसांचे कष्ट, घरची गरिबी आणि शेवटी देशसेवेचे स्वप्न पूर्ण होऊन मिळालेले हे मोठे यश या सर्व भावना एकाच वेळी दाटून आल्यामुळे हे चारही विद्यार्थी प्रचंड भावूक झाले होते. गुलालाने माखलेल्या चेहऱ्यांवरून आनंदाश्रू वाहू लागल्याने त्यांना आपले रडू आवरणे कठीण झाले होते. देशाची सेवा करण्याची अधिकृत संधी मिळाल्यामुळे निर्माण झालेला तो भावनिक क्षण उपस्थितांच्याही डोळ्यात पाणी आणणारा ठरला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्येही योग्य मार्गदर्शन आणि दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर ग्रामीण भागातील मुले देशाच्या रक्षणासाठी थेट सैन्यदलात दाखल झाली असून, त्यांच्या या यशामुळे छत्रपती करिअर अकॅडमी आणि संपूर्ण माणगांव तालुक्याचे नाव अभिमानाने उंचावले आहे. सर्व स्तरांतून या भारतीय सैनिकांवर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



Comments
Post a Comment