भिसे खिंडीतील अपघाताच्या पोलीस रेकॉर्डमध्ये मोठी तांत्रिक चूक!
'त्या' डंपरचा खरा नंबर अखेर 'जागृत पोलीस टाईम्स'कडून उघड!विम्याचे पैसे लाटण्यासाठी डंपर मालकाचा खोटा ड्रायव्हर उभा करण्याचा कट कायम
रोहा-रायगड, दि. १ जुलै (विशेष प्रतिनिधी) :- रोहा-नागोठणे मार्गावरील भिसे खिंडीत केटीएम मोटरसायकलला झालेल्या भीषण अपघातात २२ वर्षीय निष्पाप तरुण राज गणेश पतंगे याच्या दुर्दैवी मृत्यूच्या प्रकरणाला आता एक नवीन आणि अत्यंत महत्त्वाचे वळण मिळाले आहे. या प्रकरणात सुरुवातीला पोलिसांच्या प्राथमिक कागदपत्रांमध्ये अपघातग्रस्त डंपरचा क्रमांक MH06BV7594 असा चुकीचा नोंदवला गेल्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला होता, कारण तो नंबर एका ऑटोरिक्षेचा निघाल्याने खळबळ उडाली होती. परंतु, 'News 24 Taas Marathi' आणि 'Jagrut Police Times' च्या शोधक पत्रकारितेतून आता समोर आले आहे की, पोलिसांच्या एफआयआर (FIR) रेकॉर्डमध्ये केवळ एका अक्षराची तांत्रिक चूक झाली असून, त्या अपघातग्रस्त डंपरचा खरा आणि अधिकृत क्रमांक 'MH06BW7594' असा आहे! डंपरचा खरा नंबर समोर आला असला, तरी खऱ्या ड्रायव्हरला वाचवण्यासाठी आणि विम्याचे पैसे हडप करण्यासाठी डंपर मालकानेने रचलेला गुन्हेगारी कट मात्र अजूनही कायम आहे आणि तो या खऱ्या नंबरच्या पुराव्यावरून अधिकच घट्ट झाला आहे.
पोलीस रेकॉर्डमधील 'त्या' एका अक्षरामुळे झाला होता रिक्षेचा संभ्रम!
अपघातानंतर रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करताना वाहनाचा क्रमांक नोंदवताना पोलिसांकडून अनवधानाने 'BW' ऐवजी 'BV' अशी नोंद झाली होती. हा 'BV' नंबर खारगाव येथील एका व्यक्तिच्या बजाज ऑटोरिक्षेचा असल्याने संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आता डंपरचा अचूक नंबर MH06BW7594 असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे, तो जड डंपर कायदेशीररीत्या कोणाच्या नावावर आहे आणि त्याचा विमा खरोखरच वैध आहे का, याचा खरा मार्ग मोकळा झाला आहे. पोलिसांनी आपल्या दोषारोपपत्रात (Charge sheet) आणि पूरक तपासात ही तांत्रिक चूक तातडीने सुधारणे अत्यंत गरजेचे आहे.
खऱ्या ड्रायव्हरकडे लायसन्स नसल्याने खोटा आरोपी उभा करण्याचा डाव!
डंपरचा नंबर बरोबर असला, तरी डंपर मालकाचा मूळ गुन्हा आणि कट बदलत नाही. अपघाताच्या रात्री डंपर चालवणाऱ्या खऱ्या चालकाकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स (Valid DL) नव्हते. मोटार वाहन कायद्यानुसार जर चालकाकडे लायसन्स नसेल, तर विमा कंपनी अपघाताचा क्लेम पूर्णपणे फेटाळून लावते. अशा परिस्थितीत मृत तरुणाच्या कुटुंबाला द्यावी लागणारी अंदाजे ५० लाख रुपयांची नुकसानभरपाई डंपर मालकाला स्वतःच्या खिशातून द्यावी लागली असती. या प्रचंड आर्थिक दंडापासून वाचण्यासाठी डंपर मालक अनंता देशमुख याने तात्काळ खऱ्या ड्रायव्हरला फरार केले आणि पंकज मिस्त्री या गरीब तरुणाला "केवळ गाडी सोडवण्याचे किरकोळ काम आहे" असे आमिष दाखवून, त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स हस्तगत करून त्याला खोटा ड्रायव्हर म्हणून पोलिसांसमोर उभे केले. समोर आलेल्या खळबळजनक ऑडिओ क्लिपमध्ये डंपर मालक पंकजला गुमराह करताना स्पष्टपणे म्हणत आहे की, "ही केवळ इन्शुरन्सची साधी केस आहे, आमचा इन्शुरन्सचा वकील सर्व मॅनेज करेल."
मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, डंपर मालकाच्या गाड्यांचा हा रायगड जिल्ह्यातील तब्बल आठवा अपघात आहे. वारंवार अपघात करूनही आणि खोटे ड्रायव्हर्स उभे करून विमा कंपन्यांना गंडा घालण्याचे हे रॅकेट गेल्या अनेक दिवसांपासून कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या आठव्या अपघाताच्या वेळी सदर डंपर धाटाव एमआयडीसीमधील "सुदर्शन" कंपनीतून रासायनिक वेस्टचा माल घेऊन निघाला होता. पोलिसांनी जर सुदर्शन कंपनीच्या गेटवरील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तात्काळ ताब्यात घेतले, तर डंपर चालवणारा तो परवाना नसलेला खरा ड्रायव्हर कोण होता, हे कायदेशीररीत्या स्पष्ट होईल. तसेच पंकज मिस्त्री याने अपघाताच्या वेळी त्याचे मोबाईल लोकेशन रोहा एमआयडीसी परिसरात असल्याचे सांगितले असल्याने, पोलिसांनी पंकजचा सीडीआर (CDR) तपासल्यास हा खोटा आरोपी उभा करण्याचा कट पूर्णपणे उधळला जाईल.
विमा कंपनी आणि रायगड पोलिसांसमोर मोठे आव्हान!
आता डंपरचा खरा नंबर (MH06BW7594) समोर आल्यामुळे, पोलिसांनी तात्काळ या वाहनाचा खरा चेसिस आणि इंजिन नंबर पडताळून घ्यावा. डंपर मालकाविरूद्ध पोलिसांची फसवणूक करणे, खोटा पुरावा तयार करणे, खोटा आरोपी उभा करणे आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी स्वतंत्र फौजदारी गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. आता या संपूर्ण रॅकेटचे बिंग फुटल्यानंतर, पोलीस निरीक्षक मारुती पाटील आणि तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय पायक हे या गंभीर प्रकरणाचा सखोल पूरक तपास (Supplementary Investigation) करून मृत राज पतंगे याच्या कुटुंबाला न्याय मिळवून देणार का, आणि खऱ्या दोषींवर कडक कारवाई करणार का, याकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Comments
Post a Comment