मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨

अलिबाग-मुरुड बायपास मार्गावरील पाले गावचा पूल बनला मृत्यूचा सापळा!
संरक्षक कठडा कोसळल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्यता प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात नागरिकांचा संताप


अलिबाग-रायगड, दि. २९ (स्वप्निल नाईक) :- अलिबाग-मुरुड (सहान बायपास मार्गे) रस्त्यावरील पाले गावाजवळ असलेल्या पुलाची संरक्षण भिंत कोसळल्याने हा पूल अत्यंत धोकादायक स्थितीत पोहोचला आहे. बेली गावाजवळील मुख्य रस्ता आणि येथील पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक घोषित केल्यामुळे गेल्या एक वर्षापासून मुरुडला जाणारी सर्व वाहतूक, तसेच राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) साऱ्या बसेस या सहान बायपास मार्गे पाले गावातून वळवण्यात आल्या आहेत. यामुळे या अरुंद व अंतर्गत रस्त्यावरून प्रचंड प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा सुरू आहे, ज्याचा थेट ताण आता पाले गावातील पुलावर पडला असून हा पूल केव्हाही कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीवर नागाव ग्रामपंचायतीच्या सरपंच हर्षदा निखिल मयेकर यांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरले आहे.

​या पुलाच्या दुरवस्थेबाबत नागाव ग्रामपंचायतीच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार केला जात आहे. तसेच लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष भेट घेऊन, स्थळ पाहणी करून येथील धोक्याची जाणीव करून दिली होती. गेल्या सहा महिन्यांपासून प्रशासनाकडून या पुलाच्या डागडुजीचे काम संथ गतीने सुरू होते, मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अखेर पुलाचा मुख्य संरक्षण कठडा कोसळला आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च करूनही जर पुलाची ही अवस्था होणार असेल, तर या दुरुस्तीचा फायदा काय, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या मार्गावरून नागाव आणि अक्षी परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांची तसेच प्रवाशांची रोज जीवघेणी वाहतूक सुरू असून, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

​सरपंच हर्षदा मयेकर यांनी प्रशासकीय अनास्थेवर तीव्र आक्षेप घेतला असून, सोलापूर जिल्ह्यातील तांदूळवाडी येथील दुर्घटना किंवा महाड येथील पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची प्रशासन वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल केला आहे. एखादी मोठी दुर्घटना घडून निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल करत त्यांनी अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी उद्या सकाळीच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली जाणार असून, प्रशासन यावर काय ठोस पावले उचलणार याची विचारणा केली जाईल.

​सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने प्रशासनाने डोळे झाकून न बसता पाले येथे तातडीने नवीन पुलाचे बांधकाम करावे किंवा जुन्या पुलाची अत्यंत जबाबदारीने व दर्जेदार पद्धतीने दुरुस्ती करावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना, वाहनचालकांना नागाव ग्रामपंचायतीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की, विशेषतः रात्रीच्या वेळी आणि मुसळधार पाऊस सुरू असताना पाले पुलावरून प्रवास करताना अत्यंत काळजी घ्यावी, परिस्थितीची पाहणी करूनच पुढे पाऊल टाकावे. आता या गंभीर इशाऱ्यानंतर तरी संबंधित यंत्रणा जागी होऊन तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेते की मोठ्या दुर्घटनेची वाट पाहते, याकडे संपूर्ण अलिबाग व मुरुड तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Comments

Popular posts from this blog