मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

रायगड जिल्ह्यात 'भाडेकरू पडताळणी अभियान' सुरू करावे
छावा क्रांतिवीर सेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख स्वप्नील घरत यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी


पनवेल-रायगड, दि. २८ (सुरेश तांडेल) :- रायगड जिल्ह्यात वाढत्या लोकसंख्येसोबतच विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणात भाडेकरू वास्तव्यास राहत आहेत. मात्र, अनेक ठिकाणी कोणतीही अधिकृत नोंद अथवा कायदेशीर पडताळणी न करताच घरे भाड्याने दिली जात असल्याने, आगामी काळात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत हद्दींमध्ये विशेष “भाडेकरू नोंदणी व पडताळणी अभियान” राबविण्यात यावे, अशी आग्रही मागणी छावा क्रांतिवीर सेनेचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख स्वप्नील घरत यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या मा. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एक सविस्तर निवेदन सादर केले असून, प्रत्येक ग्रामपंचायतीमार्फत स्थानिक पातळीवर भाडेकरूंची अधिकृत माहिती संकलित करून त्याची पद्धतशीर नोंद ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे या निवेदनात नमूद केले आहे.

​या मागणीनुसार, प्रत्येक घरमालकाने आपल्या भाडेकरूचे पूर्ण नाव, त्याचा कायमचा पत्ता, मोबाईल क्रमांक, आधार कार्ड अथवा इतर वैध ओळखपत्राचा तपशील, कुटुंबातील एकूण सदस्यांची माहिती, त्यांचा व्यवसाय, घरमालकाचा स्वतःचा संपर्क क्रमांक तसेच भाडेकराराची प्रत या सर्व बाबी संबंधित ग्रामपंचायतीकडे सादर करणे प्रशासनाने  करावे, असे घरत यांनी म्हटले आहे. हे विशेष पडताळणी अभियान राबविल्यामुळे परिसरात वास्तव्यास असलेल्या संशयित व्यक्ती, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक, बेकायदेशीररीत्या राहणारे परप्रांतीय तसेच रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांची अचूक माहिती प्रशासनाच्या हाती लागण्यास मोठी मदत होईल. अनेकदा स्थानिक पातळीवर योग्य नोंद उपलब्ध नसल्यामुळे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा तपास करताना पोलीस प्रशासनाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे ग्रामपंचायत, स्थानिक पोलीस प्रशासन आणि घरमालक यांच्यात योग्य समन्वय साधून जर ही पडताळणी प्रक्रिया राबवली, तर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. तसेच भविष्यात कोणतीही अनुचित किंवा संशयास्पद घटना घडल्यास, संबंधित व्यक्तींची माहिती तत्काळ उपलब्ध होऊन प्रशासनाला जलद गतीने कायदेशीर कारवाई करणे सुलभ होईल. म्हणूनच जनहित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून हा विशेष उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात तातडीने राबविण्यात यावा, अशी मागणी स्वप्नील घरत यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.

Comments

Popular posts from this blog