मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

रोहा : जागेच्या वादातून शेजाऱ्यांचे हिंसक कृत्य! 
महिलेचा विनयभंग करत कुटुंबावर रॉड आणि विटांनी जीवघेणा हल्ला


​रोहा-रायगड, दि. १६ (प्रतिनिधी) :- घरासमोरील जागेच्या जुन्या वादाचे पर्यावसान अत्यंत हिंसक हाणामारीत झाल्याची खळबळजनक घटना रोहा तालुक्यातील निडी येथे घडली आहे. शेजारी राहणाऱ्या चार जणांनी एकत्र येऊन फिर्यादी यांच्या कुटुंबाला लाठ्या-काठ्या, स्टीलचा रॉड आणि विटांनी बेदम मारहाण केली. या धुमश्चक्रीत एका महिलेची साडी ओढून, तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून तिचा विनयभंग देखील करण्यात आला आहे. या गंभीर प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून रोहा पोलिसांनी चौघांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

​या घटनेची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, निडी (पो. मेढा, ता. रोहा) येथील फिर्यादी आणि त्यांच्या शेजारी राहणारे आरोपी यांच्यात जागेच्या कारणावरून पूर्वीपासून वाद सुरू आहे. दि. १५ मे २०२६ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास फिर्यादी यांच्या घराजवळ याच जागेवरून पुन्हा एकदा वाद पेटला. आरोपी क्रमांक १ ते ४ यांनी फिर्यादी यांना घेरले आणि अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हा वाद ऐकून फिर्यादी यांची काकी भांडण सोडवण्यासाठी आणि आपापसातील वाद मिटवण्यासाठी तेथे आली. मात्र, आरोपींचा राग अनावर झाला होता. आरोपी क्रमांक १ याने त्या महिलेशी अत्यंत असभ्य वर्तन करत तिची साडी ओढली. तसेच तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जोराने खेचले, ज्यामुळे ते तुटून खाली पडले आणि सोन्याच्या दागिन्याचे नुकसान झाले.

​हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही, तर आरोपींनी फिर्यादीच्या कुटुंबाला संपवण्याच्या उद्देशाने थेट जीवघेणा हल्ला चढवला. आरोपी क्रमांक १ याने सोबत आणलेला स्टीलचा रॉड हवेत फिरवून फिर्यादी यांच्यावर जोरदार वार केला. हा वार अडवण्याच्या प्रयत्नात फिर्यादीच्या डाव्या हाताच्या बोटाला अत्यंत गंभीर दुखापत झाली. त्यानंतर आरोपीने आपला मोर्चा फिर्यादीच्या भावाकडे वळवला आणि त्याच्या छातीवर रॉडने जबर प्रहार करून त्याला गंभीर जखमी केले. याच वेळी इतर तीन आरोपींनी आधीच ठरवलेल्या कटानुसार घटनास्थळावर पडलेले बांबू, विटा आणि कौले उचलली. या चौघांनी संगणमत करून फिर्यादीच्या अंगावर विटा आणि कौले फेकून मारली, तसेच बांबूने बेदम मारहाण करत त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.

​या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबीय प्रचंड घाबरले. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर फिर्यादी यांनी रोहा पोलीस ठाण्यात जाऊन शेजाऱ्यांविरुद्ध रीतसर फिर्याद दिली.

​या तक्रारीच्या आधारे रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ११८(२), ११८(१), ३५२, ३५१(२), ३२४(४), ७४ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदा हातात घेऊन अशा प्रकारे हिंसक कृत्य करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. या घटनेचा पुढील सखोल तपास पोलीस नाईक सुनील शिरसाठ करत आहेत.

Comments

Popular posts from this blog