मुरुड पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा!
दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल
मुरूड-रायगड (प्रतिनिधी) :- मुरुड शहर आणि परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करणाऱ्या मुरुड पोलीस ठाण्याच्या आवारातच चक्क पोलिसांशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मुरुड पोलीस ठाणे हद्दीतील एका जुन्या गुन्ह्याच्या (गु.रजि.नं. ७०/२०२६) तपासासंदर्भात फिर्यादी आणि संबंधित व्यक्तींना पोलीस ठाण्यात पाचारण करण्यात आले होते. रात्री साधारण ८:५६ वाजण्याच्या सुमारास तपासी अधिकारी आणि पोलीस कर्मचारी आपल्या दप्तरी कक्षात बसून शासकीय कामकाज पूर्ण करत होते. यावेळी या गुन्ह्यातील आरोपीची दोन मुले पोलीस ठाण्यात उपस्थित होती. तपासाचा भाग म्हणून जेव्हा उपस्थित पोलीस अंमलदारांनी आरोपी क्रमांक १ याला त्याचे नाव आणि पत्ता विचारला, तेव्हा त्याने सहकार्य करण्याऐवजी पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली.
नाव-पत्ता सांगण्याच्या साध्या कारणावरून सुरू झालेला हा वाद काही वेळातच विकोपाला गेला. या दोन्ही तरुणांनी आपापसात संगणमत करून पोलीस ठाण्यासारख्या संवेदनशील ठिकाणी मोठमोठ्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. केवळ आरडाओरडा करून न थांबता, त्यांनी कर्तव्यावर असलेल्या ठाणे अंमलदारांशी अत्यंत उद्धटपणे हुज्जत घातली. ही मुले इतकी आक्रमक झाली होती की, ती पोलिसांच्या अंगावर धावून गेली आणि त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. "तुम्हाला बघून घेतो," अशा शब्दांत त्यांनी पोलिसांना जाहीर धमकी दिली, ज्यामुळे पोलीस ठाण्यातील शांततेचा भंग होऊन शासकीय कामकाजात मोठा व्यत्यय निर्माण झाला.
या सर्व प्रकारानंतर मुरुड पोलिसांनी या दोन्ही तरुणांविरुद्ध कठोर कायदेशीर पाऊल उचलले आहे. सरकारी कर्मचाऱ्याला त्याचे कर्तव्य बजावण्यापासून रोखणे, धमकी देणे आणि सार्वजनिक शांततेचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७३/२०२६ नुसार नोंद करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १३२, २२१, ३५२, ३(५) तसेच मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ११२ व ११७ चा समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने याचा तपास तातडीने सुरू केला असून, सहाय्यक फौजदार गदमले यांच्याकडे या गुन्ह्याचा पुढील तपास सोपवण्यात आला आहे. पोलीस ठाण्यातच पोलिसांना धमकावणाऱ्या अशा प्रवृत्तींविरुद्ध आता पोलीस काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण मुरुड तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Comments
Post a Comment