पोलादपूरमध्ये महिलेचा विनयभंग!
आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
पोलादपूर-रायगड, दि. १४ (प्रतिनिधी) :- पोलादपूर तालुक्यातील सवाद परिसरातील एका घटनेने सध्या परिसरात मोठी खळबळ माजली असून, एका महिलेच्या घरात शिरून तिला शिवीगाळ करत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी महिला आपल्या घरी असताना सवाद येथील आरोपीने त्यांच्या घराबाहेर येऊन मोठ्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपीने फिर्यादीला उद्देशून अत्यंत आक्षेपार्ह विधान केले. "तुम्ही आमच्या मुलीची इज्जत काढली आहे, आता आम्ही सुद्धा तुमची इज्जत काढू," असे म्हणत आरोपीने फिर्यादीला धमकावण्यास सुरुवात केली. घराबाहेर सुरू असलेला हा गोंधळ आणि अर्वाच्य भाषेतील शिवीगाळ ऐकून जेव्हा फिर्यादी महिला घराबाहेर आली, तेव्हा आरोपीने अधिक आक्रमक पवित्रा घेतला.
यावेळी आरोपीने केवळ शब्दांनी अपमान केला नाही, तर वाईट हेतूने फिर्यादी महिलेच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. हा प्रकार घडत असताना फिर्यादीच्या बचावासाठी त्यांच्या सासू, जेठाणी आणि नणंद धावून आल्या असता, आरोपीने त्यांनाही सोडले नाही. त्याने उपस्थित असलेल्या या सर्व महिलांना अत्यंत हीन दर्जाची वागणूक देत शिवीगाळ केली आणि परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले. स्वतःच्याच घराच्या अंगणात एका महिलेचा अशा प्रकारे विनयभंग झाल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
या सर्व प्रकारानंतर पीडित महिलेने तातडीने पोलादपूर पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केली आणि आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी सवाद येथील आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ७४, ३५१(२) आणि ३(५) नुसार गुन्हा रजिस्टर नंबर ५२/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवादार राजेश पवार हे या घटनेचा सखोल तपास करत असून, साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. भरवस्तीत आणि घरासमोरच महिलांना अशा प्रकारे धमकावण्याच्या वाढत्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Comments
Post a Comment