मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

लग्नविषयक वादातून कशेळे येथे दोन गटात तुंबळ हाणामारी; चाकू आणि दगडाने हल्ला!
दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून कर्जत पोलिसांत गुन्हे दाखल


कर्जत-रायगड, दि. २४ (प्रतिनिधी) :- कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे कशेळे येथे लग्न ठरवण्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या दोन्ही गटांनी एकमेकांवर दगड, बेल्ट आणि चाकूने जीवघेणा हल्ला केल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी तक्रारींवरून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

​पहिली घटना उल्हासनगर येथील रहिवासी असलेल्या महिला फिर्यादी यांच्या तक्रारीवरून समोर आली आहे. या महिला फिर्यादी, त्यांची मुलगी, आई आणि भाऊ हे सर्वजण २३ मे २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कशेळे येथे आरोपीच्या घरी लग्नाची बोलणी करण्यासाठी गेले होते. लग्नाची बोलणी सुरू असतानाच दोन्ही पक्षांमध्ये अचानक कडाक्याचे भांडण झाले. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असता, आरोपी क्रमांक ३ आणि आरोपी क्रमांक १ यांनी फिर्यादी महिला व तिच्या कुटुंबीयांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरवात केली. हा वाद इतका वाढला की, आरोपी क्रमांक ४ हिने फिर्यादीच्या मुलीच्या पाठीत दगडाने मारले, ज्याला प्रत्त्युत्तर म्हणून फिर्यादीच्या मुलीनेही आरोपीच्या डोक्यात मारले. त्यानंतर आरोपी क्रमांक ४ हिने बेल्टने (पट्ट्याने) बेदम मारहाण केली आणि दोन्ही बाजूंच्या कुटुंबामध्ये जोरदार हाताबुक्की झाली. या गोंधळानंतर फिर्यादी महिला, त्यांची मुलगी आणि आई कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी निघाल्या होत्या. कशेळे-नेरळ रस्त्यावर त्या एका साक्षीदाराच्या मालकीच्या 'ब्रिझा' कारमध्ये बसत असतानाच, सर्व आरोपी आणि त्यांच्या तीन नातेवाईकांनी त्यांना रस्त्यात गाठले. तेथे त्यांना पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, तसेच साक्षीदाराच्या गाडीची तोडफोड करून मोठे नुकसान करण्यात आले. या हल्यात संशयितांनी फिर्यादी महिला यांचा मोबाईल आणि चष्मा हिसकावून घेऊन तोडून टाकला. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २३१/२०२६ नुसार, भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १८९(२), १९१(२), १९०, ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३२४(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​या घटनेची दुसरी बाजू कशेळे येथील रहिवासी असलेल्या दुसऱ्या गटाच्या फिर्यादीने मांडली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी त्यांना आधीच इंस्टाग्रामवर 'मी व घरातील लोक उद्या तुझ्या घरी येणार आहोत' असा मेसेज पाठवला होता. त्यानुसार २३ मे रोजी दुपारी साडेबारा वाजता सर्व आरोपी आणि त्यांचे नातेवाईक फिर्यादीच्या घरात घुसले. त्यावेळी घरात फिर्यादीसह त्यांची आई आणि आजी-आजोबा उपस्थित होते. घरात चर्चा सुरू असतानाच दोन्ही बाजूंच्या महिलांमध्ये वाद पेटला आणि आरोपी क्रमांक २ व ३ यांनी फिर्यादी आणि त्यांच्या आईला घाणेरडी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, तसेच फिर्यादीच्या आईच्या पोटात जोरात लाथ मारली. घरात सुरू असलेला हा राडा पाहून फिर्यादीने तात्काळ आपल्या बहिणीला फोन करून घरी बोलावून घेतले. फिर्यादीची बहीण मदतीसाठी रस्त्यावर आली असता, आरोपी क्रमांक २ हिने स्वतःसोबत आणलेला धारदार चाकू काढून तिच्या डोक्यात थेट वार केला. या प्राणघातक हल्ल्यात फिर्यादीची बहीण गंभीर जखमी झाली. याप्रकरणी कर्जत पोलिसांनी दुसऱ्या गटाच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक २३२/२०२६ नुसार, भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१), ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

​लग्नाच्या बोलणीवरून सुरू झालेल्या या कौटुंबिक वादाने थेट रस्त्यावरील टोळीयुद्धाचे रूप घेतल्याने कशेळे नेरळ रस्त्यावर काही काळ घबराट पसरली होती. भरदिवसा झालेल्या या हाणामारीत चाकू, दगड आणि पट्ट्यांचा उघड वापर करण्यात आल्याने पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या दोन्ही परस्परविरोधी गुन्ह्यांचा पुढील कायदेशीर आणि अधिक तपास पोलीस हवादार हनुमंत गायकवाड हे अत्यंत सतर्कतेने करत आहेत.

Comments

Popular posts from this blog