बालविवाहाच्या बेड्या तोडा आणि लेकींच्या स्वप्नांना पंख द्या!
रायगड पोलिसांचे जनतेला भावनिक आवाहन
रोहा-रायगड, दि. १७ (प्रतिनिधी) :- रायगड सद्यस्थितीत समाज प्रगत होत असतानाच दुसरीकडे आजही काही ठिकाणी बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथांचे सावट पाहायला मिळते. या पार्श्वभूमीवर, बालविवाह रोखण्यासाठी आणि लहान मुलींच्या उज्वल भविष्यासाठी रायगड पोलिसांनी आता कंबर कसली आहे. रायगड पोलिसांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून एक अत्यंत प्रभावी आणि हृदयस्पर्शी जनजागृती मोहीम हाती घेतली असून, त्याद्वारे नागरिकांना बालविवाहाच्या विरोधात उभे राहण्याचे आवाहन केले आहे.
रायगड पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या संदेशात असे स्पष्ट करण्यात आले आहे की, अल्पवयीन वयात लग्न लावणे म्हणजे केवळ एका परंपरेचे पालन नसून, तो एका कोवळ्या जीवाच्या स्वप्नांचा अंत आहे. ज्या वयात मुलींच्या हातात शिक्षणाची पुस्तके आणि प्रगतीची स्वप्ने असायला हवीत, त्याच वयात त्यांच्या गळ्यात लग्नाची माळ टाकून त्यांचे बालपण आणि भविष्य अंधकारात ढकलले जात आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, समाजातील प्रत्येक घटकाने याविरुद्ध आवाज उठवणे ही काळाची गरज बनली आहे. "तिच्या स्वप्नांना पंख द्या, बंधन नको" असे सांगत पोलिसांनी पालकांना आणि समाजाला असा संदेश दिला आहे की, मुलींना लग्नाच्या बेड्यांत अडकवण्यापेक्षा त्यांना शिक्षण देऊन स्वावलंबी बनवणे अधिक महत्त्वाचे आहे.
पोलिसांनी पुढे असेही स्पष्ट केले की, बालविवाह हा केवळ सामाजिक गुन्हा नसून तो कायद्याने सुद्धा एक गंभीर अपराध आहे. असे असतानाही जर कोठे छुप्या पद्धतीने बालविवाह होत असल्याचे आढळल्यास, नागरिकांनी शांत न राहता त्वरित प्रशासनाला माहिती द्यावी. यासाठी रायगड पोलिसांनी १०९८ (चाइल्ड हेल्पलाईन) आणि ११२ हे आपत्कालीन क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. याशिवाय नागरिक जवळच्या स्थानिक पोलीस स्टेशनशी देखील संपर्क साधू शकतात. माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय राखली जाईल, अशी ग्वाही देखील पोलिसांकडून देण्यात आली आहे.
एका मुलाचे किंवा मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी तुमचा केवळ एक फोन कॉल पुरेसा ठरू शकतो. समाजातील सुजाण नागरिकांनी केवळ प्रेक्षक न राहता, बालविवाहासारख्या घटनांना रोखण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवला तरच खऱ्या अर्थाने भविष्य सुरक्षित होईल, असा विश्वास रायगड पोलिसांनी व्यक्त केला आहे. बालविवाह रोखा आणि उद्याचे भविष्य वाचवा, या मोहिमेला आता सर्वच स्तरांतून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून, रायगड पोलिसांच्या या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments
Post a Comment