मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई!
गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद



शिरूर-पुणे वृत्त (रणजीत मस्के) :- पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी शिरूर परिसरात मोठी कारवाई करत दोन तरुणांना एका गावठी पिस्टलसह ताब्यात घेतले आहे. पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने एटीएसचे पथक शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत असताना, सतरा कमान रोडवरील पांजरपोळ समोर एक इसम बेकायदेशीर शस्त्र घेऊन फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे शिरूर पोलिसांच्या मदतीने सदर ठिकाणी छापा टाकला असता सुमित वसंत शेळके (वय २०, रा. पळवे खुर्द, ता. पारनेर) आणि साजिद रफिक खान (वय ३०, रा. मंगलमूर्ती नगर, शिरूर) या दोघांना संशयास्पदरीत्या ताब्यात घेण्यात आले.

​त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ५० हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल मिळून आले. प्राथमिक चौकशीत साजिद खान याने हे पिस्टल सुमित शेळके याला विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. हे दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर सुमारे एक वर्षापूर्वी अहिल्यानगरमधील सुपा एमआयडीसी येथे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टच्या वादातून खुनाचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने दोन्ही आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

​सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, उपनिरीक्षक शुभम चव्हाण, नीरज पिसाळ आणि एटीएसच्या कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली. हे शस्त्र आरोपींनी कोणत्या उद्देशाने आणि कोठून आणले होते, याचा पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत.

Comments

Popular posts from this blog