व्हिडीओ व्हायरल करण्याच्या वादातून आरफळ येथे हत्या!
सातारा तालुका पोलिसांकडून अवघ्या ४ तासांत आरोपीला अटक
सातारा वृत्त (रणजीत मस्के) :- सातारा तालुक्यातील आरफळ गावच्या हद्दीत 'गावंधर' नावाच्या शिवारात किरकोळ वादातून एका व्यक्तीची खोऱ्याने डोक्यात वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती, मात्र सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या डी. बी. पथकाने अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवून अवघ्या चार तासांच्या आत आरोपीला जेरबंद केले आहे.
मिळालेले माहितीनुसार, आरफळ येथील काही मुले दुचाकीतून पेट्रोल काढत होती. या घटनेचा व्हिडीओ गावात व्हायरल करू नको आणि विनाकारण मुलांना बदनाम करू नको, असे फिर्यादीच्या पतीने संबंधित मुलांना समजावून सांगितले होते. याचाच राग मनात धरून, संशयित आरोपीने रागाच्या भरात फिर्यादीच्या पतीवर खोऱ्याने हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी तात्काळ तपासाच्या सूचना दिल्या होत्या. सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) पथकाने गोपनीय माहिती काढण्यास सुरुवात केली. तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शिवथर परिसरातून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार (खोरं), मोबाईल आणि दुचाकी वाहन हस्तगत केले असून त्याला रितसर अटक करण्यात आली आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन काटकर, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव, अंमलदार मनोज गायकवाड, दादा स्वामी, संदीप पांडव, राजू शिखरे, उमेश माने, शिवाजी वायदंडे, प्रविण वायदंडे, रामचंद्र गोरे, मालोजी चव्हाण, सुनील भोसले, अजित निकम, रायसिंग घोरपडे, विद्या कुंभार, किरण निकम, संदीप फणसे, शंकर पाचांगणे आणि होमगार्ड पथकाने केली आहे. या धडाकेबाज कारवाईबद्दल पोलीस अधीक्षकांनी संपूर्ण पथकाचे विशेष कौतुक आणि अभिनंदन केले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश तांबे करत आहेत.

Comments
Post a Comment