रस्त्यावरील वादातून रिक्षाचालकाचा थरारक पाठलाग करून मारहाण
रसायनी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल
रसायनी, दि. २४ (प्रतिनिधी) :- रस्त्यावरून वाहन चालवताना होणाऱ्या वादाचे पर्यावसान अनेकदा गंभीर हिंसेत होते, याचा प्रत्यय रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुकताच आला आहे. क्षुल्लक अपघाताच्या कारणावरून एका कार चालकाने रिक्षाचालकाचा वावेघर ते सावळे गावापर्यंत थरारक पाठलाग करून त्याला भररस्त्यात अडवून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रसायनी पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रिक्षाचालक हे पनवेल तालुक्यातील दापिवली गावचे रहिवासी असून ते आपल्या कुटुंबातील मुलांसह स्वतःच्या मालकीची रिक्षा (क्रमांक MH-46-BK-3214) घेऊन कामानिमित्त मुंबईच्या दिशेने जात होते. त्यांची रिक्षा मौजे वावेघर गावच्या हद्दीत मुख्य रस्त्यावरील स्पीडब्रेकरजवळ आली असता, पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या मारुती सुझुकी फ्रॉन्क्स कारने (क्रमांक MH-46-BZ-9066) रिक्षाला जोरात धडक दिली. या धडकेत रिक्षाच्या मागील बाजूचा सेफ्टी गार्ड दबला गेल्याने रिक्षाचे नुकसान झाले.
धडक बसल्यानंतर रिक्षाचालकाने कार चालकाकडे या नुकसानीबाबत विचारणा केली. त्यावेळी कार चालक (आरोपी क्र. १) याने सामोपचाराने बोलण्याऐवजी फिर्यादीशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली आणि रागाच्या भरात रिक्षाचालकाच्या कानशिलात लगावली. यावेळी फिर्यादीने प्रतिकार केला असता, त्यांना कार चालक मद्याच्या नशेत असल्याचे जाणवले. वाद वाढत असतानाच आरोपीने रिक्षाचा पुढचा वायपर तोडून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातला. फिर्यादीला कामावर जाण्यास उशीर होत असल्याने त्यांनी तिथून पुढे जाणे पसंत केले आणि ते मुंबईच्या दिशेने निघाले.
मात्र, आरोपीचा राग शांत झाला नव्हता. त्याने वावेघर ते सावळे गावापर्यंत रिक्षाचा पाठलाग केला. पहाटे ३:०५ वाजताच्या सुमारास सावळे गावच्या हद्दीत एका वळणावर आरोपीने आपली कार रिक्षासमोर आडवी लावून रिक्षा थांबवली. यावेळी आरोपी क्र. १ याने आपल्या साथीदाराला (आरोपी क्र. २, रा. वावेघर) बोलावून घेतले. दुसऱ्या आरोपीनेही रिक्षाचालकावर हात उगारला. दरम्यान, आरोपी क्र. १ याने आधीच्या भांडणाचा राग मनात धरून रिक्षात बसलेल्या फिर्यादीच्या मुलीसमोर आई-वडिलांवरून अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने फिर्यादीच्या तोंडावर हाताने जोरात फाईट मारली, ज्यामुळे त्यांच्या उजव्या डोळ्याच्या भुवईखाली गंभीर दुखापत झाली.
या खळबळजनक घटनेनंतर पीडित रिक्षाचालकाने रसायनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत आरोपींविरुद्ध रसायनी पोलीस ठाणे गु.र.नं. ६३/२०२६ नुसार, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १२६(२), ११५(२), ३५२, २८१, ३२४(१) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवादार पाटील हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

Comments
Post a Comment