काळजाचा थरार..! रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई
वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस; पोलिसांनी केली यशस्वी सुटका
रोहा-रायगड, दि. १० (प्रतिनिधी) :- रायगड जिल्हा पोलीस दलाने वेठबिगारी विरुद्ध एक अत्यंत महत्त्वाची आणि धडाकेबाज कारवाई केली असून, पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथून एका अल्पवयीन मुलाची सुटका करण्यात आली आहे. ही घटना रोहा तालुक्यातील धगडवाडी आदिवासीवाडी येथील एका कुटुंबासोबत घडली. कैलास भुऱ्या वाघमारे आणि त्यांची पत्नी हौशी वाघमारे हे आपल्या तीन मुलांसह रोजगाराच्या शोधात पुणे जिल्ह्यातील वालचंदनगर येथील शब्बीर दस्तगीर शेख यांच्या वीटभट्टीवर कामासाठी गेले होते. मात्र, तिथे कामाला लागल्यानंतर मालक शब्बीर शेख हा त्यांच्या कामाचा योग्य हिशोब देत नव्हता, तसेच कुटुंबाला वेळेवर धान्य न देता सतत मानसिक व शारीरिक त्रास देत होता. केलेल्या कामाचे पैसे मिळत नसल्याने आणि मालकाच्या जाचाला कंटाळून वाघमारे दांपत्य आपली दोन मुले तुषार आणि संतोष यांच्यासह तिथून पळून आपल्या मूळ गावी परतले. परंतु, पळून येत असताना त्यांचा १६ वर्षांचा मुलगा विशाल कैलास वाघमारे याला वीटभट्टी मालकाने तिथेच अडकवून ठेवले होते.
या गंभीर प्रकाराची माहिती सर्वहारा जन आंदोलन संघटनेमार्फत कोलाड पोलिसांना प्राप्त झाली. घटनेचे गांभीर्य ओळखून रायगडच्या पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फार्णे यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कोलाड पोलीस ठाण्याचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक एस. जी. भोजकर आणि पोलीस हवालदार एस. बी. मेरगळ यांचे पथक मुलाच्या वडिलांना सोबत घेऊन तातडीने वालचंदनगर येथे रवाना झाले. तिथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने विशाल वाघमारे याची यशस्वी सुटका करण्यात आली आणि आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला सुखरूपपणे पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
या यशस्वी कामगिरीनंतर रायगड पोलिसांनी जनतेला आणि विशेषतः रोजगारासाठी स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. कामासाठी जिल्ह्याबाहेर जाताना आपली नोंद स्थानिक ग्रामपंचायत किंवा पोलीस पाटील यांच्याकडे आवर्जून करावी, जेणेकरून प्रशासनाकडे तुमची माहिती उपलब्ध राहील, असे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच स्थलांतर करताना सोबत आधार कार्ड, रेशन कार्ड आणि मालकाचा पूर्ण पत्ता व फोन नंबर नातेवाईकांना द्यावा, असेही सूचित करण्यात आले आहे. मुलांच्या शिक्षणाबाबत तडजोड न करता त्यांना हंगामी वस्तीगृहात ठेवण्याचा प्रयत्न करावा आणि कामाच्या ठिकाणी पगार रोखणे, मारहाण किंवा ओलीस ठेवणे यांसारखा छळ सहन न करता तात्काळ पोलीस मदत केंद्र १००, ११२ किंवा चाईल्ड हेल्पलाईन १०९८ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अन्याय सहन न करता आवाज उठवा, पोलीस प्रशासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वासही यावेळी देण्यात आला.

Comments
Post a Comment