रोहा पोलिसांची मोठी कामगिरी; दोन बालविवाह रोखले!
कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल
रोहा, दि. १४ (प्रतिनिधी) :- रायगड जिल्ह्यातील रोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बालविवाहासारखी सामाजिक अनिष्ट प्रथा मुळापासून उखडून टाकण्यासाठी पोलिसांनी अत्यंत प्रभावी आणि कौतुकास्पद मोहीम राबवली आहे. रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली, रोहा पोलीस पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी होणारे बालविवाह वेळेत हस्तक्षेप करून यशस्वीपणे रोखले आहेत. विशेष म्हणजे, वारंवार समज देऊनही कायद्याचे पालन न करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर पावले उचलत गुन्हे दाखल करण्याची कारवाई देखील केली आहे.
बालविवाह रोखण्याची पहिली यशस्वी कारवाई मौजे गायचोळे आदिवासी वाडी येथे करण्यात आली. १६ मार्च २०२६ रोजी या ठिकाणी एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह त्याच वाडीतील एका २० वर्षीय तरुणासोबत लावला जाणार होता. या विवाहाची लग्नपत्रिका रोहा पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार महिला पोलीस हवालदार मंगल टेमकर यांना गोपनीय माहितीसह प्राप्त झाली. त्यांनी तातडीने ही माहिती प्रभारी अधिकारी श्री. मारुती पाटील यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस दिदी मंगल टेमकर, चणेरा बीट अंमलदार पोलीस हवालदार नरेश मोरे व पोलीस नाईक भास्कर शिद, बिरवाडी पोलीस पाटील श्री. अहिरे आणि ग्रामसेवक श्री. सोनुणे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तिथे जमलेल्या नातेवाईकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले गेले. बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार मुलीचे वय १८ आणि मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे, याची जाणीव करून देत पोलिसांनी पालकांचे मतपरिवर्तन केले आणि त्या अल्पवयीन मुलीचे आयुष्य अंधारात जाण्यापासून वाचवून हा बालविवाह यशस्वीपणे रोखला.
अशाच प्रकारची दुसरी मोठी कारवाई मे २०२६ मध्ये पुन्हा एकदा गायचोळे आदिवासी वाडीतच करण्यात आली. कोलाड येथील एका २० वर्षीय तरुणाशी १७ वर्षीय मुलीचा विवाह लावून देण्याची तयारी नातेवाईकांनी केली होती. चणेरा बीट अंमलदार पोलीस हवालदार नरेश मोरे यांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा प्रभारी अधिकारी श्री. सुयश कुमार सिंह यांना कळवले. सुयश कुमार सिंह यांनी या मोहिमेचे नेतृत्व करत पोलीस पथकासह घटनास्थळ गाठले. यावेळी पोलिसांनी गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री. परशुराम अंबरे यांच्या मदतीने ग्रामस्थांना कायद्याची माहिती दिली आणि हा दुसरा बालविवाह देखील रोखला.
केवळ विवाह रोखूनच पोलीस थांबले नाहीत, तर कायद्याचे पालन न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे पाऊलही उचलले आहे. भुवनेश्वर आदिवासी वाडी येथील एका प्रकरणात २८ जून २०२५ रोजी एका अल्पवयीन मुलीचा विवाह संपन्न होणार असल्याची पूर्वसूचना पोलिसांना मिळाली होती. त्यावेळी प्रभारी अधिकारी श्री. मारुती पाटील यांनी संबंधितांना हा विवाह न करण्याबाबत समज दिली होती. मात्र, पोलिसांच्या सूचनेला केराची टोपली दाखवत वाडीवर हळदीचा कार्यक्रम सुरू करण्यात आला. माहिती मिळताच प्रभारी अधिकारी श्री. मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. सलमान खतीब, पोलीस हवालदार अविनाश पाटील, पोलीस हवालदार सुनील सकपाळ आणि पोलीस दिदी महिला पोलीस हवालदार मंगल टेमकर या पोलीस पथकाने तिथे धाड टाकली. तिथे १६ वर्ष १० महिने १८ दिवस वय असलेली अल्पवयीन पीडित मुलगी तीन महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले.
या गंभीर प्रकारानंतर पोलिसांनी आरोपी अक्षय पवार, त्याचे आई-वडील आणि पीडित मुलीचे आई-वडील यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS), पोक्सो कायदा आणि बालविवाह प्रतिबंधक अधिनियमाच्या विविध कलमान्वये रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा (गुन्हा रजि. नं. १३४/२५) दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्रही सादर करण्यात आले आहे. रोहा पोलिसांच्या या सातत्यपूर्ण आणि निर्भीड कारवाईमुळे परिसरात बालविवाह करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ही संपूर्ण कामगिरी परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. सुयश कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झाली आहे.


Comments
Post a Comment