मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

नागोठणे परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत मालाडमधील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू


​नागोठणे, दि. ४ (प्रतिनिधी) :- मुंबईतील मालाड येथून आपल्या मूळ गावी रत्नागिरीला जाण्यासाठी निघालेल्या एका २६ वर्षीय तरुणावर काळाने झडप घातली आहे. नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिकणी गावच्या रेल्वे पुलाजवळ शुक्रवारी सकाळी एका अज्ञात वाहनाने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात हा तरुण जागीच ठार झाला. सौरभ संतोष आग्रे (वय २६ वर्ष, रा. तानाजी नगर, कुरार व्हिलेज, मालाड पूर्व) असे या अपघातात प्राण गमावलेल्या तरुणाचे नाव असून तो मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड येथील रहिवासी होता.

​मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ आग्रे हा ३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजण्याच्या सुमारास आपल्या ताब्यातील मोटारसायकलवरून मालाड येथून मालगुंडच्या दिशेने प्रवास करत होता. मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे परिसरातील चिकणी गावच्या हद्दीत रेल्वे पुलापासून साधारण ५० मीटर अंतरावर तो पोहोचला असता, पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव अज्ञात वाहनाने त्याच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, सौरभ गंभीररीत्या जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.

​या अपघाताची माहिती मिळताच नागोठणे पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृत सौरभच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून नागोठणे पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ७१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(A), १२५(B) आणि मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १८४ व १३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने फरार वाहन चालकाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. एका तरुण मुलाचा असा अपघाती मृत्यू झाल्याने आग्रे कुटुंबासह त्यांच्या मूळ गावी मालगुंड येथे शोककळा पसरली आहे.

Comments

Popular posts from this blog