मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 मुंबईत गुन्हा करून गोव्याच्या दिशेने पळणाऱ्या आरोपीला रायगड जिल्ह्यात अटक! गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) आणि पोलादपूर पोलिसांची मुंबई-गोवा हायवेवर धाडसी कारवाई... 🚨

नागोठणे येथील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानच्या रस्त्यावर अतिक्रमण
ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे संताप, कायदेशीर कारवाईचा इशारा


नागोठणे (सुहेल पानसरे) :- रोहा तालुक्यातील नागोठणे येथील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर एका खासगी व्यक्तीकडून बेकायदेशीररीत्या अतिक्रमण करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या अतिक्रमणामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नेण्यास मोठी अडचण निर्माण होत असून, वारंवार तक्रार करूनही स्थानिक प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागोठणे येथील मुस्लिम समाजाने केला आहे. या प्रकरणाबाबत आता समाजाने आक्रमक पवित्रा घेतला असून ग्रामपंचायतीला कायदेशीर नोटीस बजावत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, नागोठणे येथील कोळीवाडा भागात सर्व्हे नंबर ८९ मध्ये मुस्लिम समाजाचे कब्रस्तान आहे. या कब्रस्तानमध्ये जाण्यासाठी कोळीवाड्याच्या मध्यभागातून एक रस्ता जातो. विशेष म्हणजे, सन २००६-०७ मध्ये नागोठणे ग्रामपंचायतीने रितसर ठराव मंजूर करून हा रस्ता मुस्लिम समाजाला कब्रस्तान वापरासाठी दिला होता. तेव्हापासून आजतागायत या रस्त्याचा वापर दफनविधीसाठी येण्या-जाण्याकरिता केला जात आहे. मात्र, २५ जानेवारी २०२५ रोजी रात्रीच्या वेळी श्रीमती कोटकर नामक महिलेने या रस्त्याच्या मध्यभागी लोखंडी शेड उभारून अतिक्रमण केले आणि कब्रस्तानचा रस्ता पूर्णपणे बंद केला.

​रस्ता बंद झाल्यामुळे मुस्लिम समाजासमोर मोठी अडचण उभी राहिली आहे. कोणाचे निधन झाल्यास अंत्ययात्रा कब्रस्तानपर्यंत नेणे आता अशक्य झाले आहे. या संदर्भात मुस्लिम समाजाच्या वतीने संबंधित महिला आणि ग्रामपंचायत प्रशासनाकडे अनेकदा तोंडी व लेखी विनंती करण्यात आली. परंतु, ग्रामपंचायत प्रशासन आणि काही स्थानिक राजकीय नेत्यांकडून या संवेदनशील विषयाकडे पूर्णपणे डोळेझाक केली जात आहे. प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

​मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, समाजात कोणत्याही प्रकारचे जातीय तेढ निर्माण होऊ नये आणि शांतता राखली जावी, या उद्देशाने आम्ही आतापर्यंत कायदेशीर मार्गाने लढा देत होतो. मात्र, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे आमचा संयम आता सुटत चालला आहे. कब्रस्तान हा अत्यंत संवेदनशील आणि भावनिक विषय असून, दफनविधीसाठी अडथळा निर्माण करणे हा एक प्रकारे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे.

​या अर्जाद्वारे समाजाने ग्रामपंचायतीला ठणकावून सांगितले आहे की, सदर रस्त्यावरील शेडचे अतिक्रमण आणि इतर अडथळे त्वरित दूर करण्यात यावेत. जर ग्रामपंचायतीने तात्काळ कायदेशीर कारवाई करून रस्ता मोकळा करून दिला नाही, तर नाईलाजास्तव ग्रामपंचायतीला या प्रकरणात पक्षकार (पार्टी) करून उच्च न्यायालयात धाव घेतली जाईल. या कायदेशीर प्रक्रियेत होणारा सर्व खर्च आणि भविष्यात उद्भवणाऱ्या परिणामांना सर्वस्वी ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार राहील, असा स्पष्ट इशाराही या पत्राद्वारे देण्यात आला आहे.

​या अर्जावर नागोठणे येथील मुस्लिम समाजातील शेकडो प्रतिष्ठित नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून, या पत्राच्या प्रती कोकण विभागीय आयुक्त, रायगड जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद) आणि गट विकास अधिकारी (रोहा) यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. आता जिल्हा प्रशासन या प्रकरणाची दखल घेऊन अतिक्रमण हटवते की प्रकरण अधिक चिघळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments

Popular posts from this blog