कांदिवलीत तरुणावर प्राणघातक हल्ला!
पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पीडिताच्या पित्याची मुख्यमंत्र्यांकडे धाव
मुंबई, दि. १७ (प्रतिनिधी) :- मुंबईतील कांदिवली परिसरात पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर लोखंडी सळईने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात कांदिवली पोलिसांनी योग्य कारवाई न केल्याचा आरोप पीडित पित्याने केला आहे. याप्रकरणी शिवसेना (शिंदे गट) बांधकाम कामगार सेना मलाड विधानसभा समन्वयक श्री. शकील शेख यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार करून न्यायाची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शकील शेख यांचा मुलगा आदिल हा आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून जात असताना, मालवणी परिसरातील शाहिद इस्माईल खान, शमीम खान आणि त्यांच्या इतर साथीदारांनी लाल रंगाच्या 'एस-प्रेसो' कारने (क्रमांक MH 47 BL 3688) त्यांचा पाठलाग केला. आरोपींनी चालत्या गाडीतूनच आदिलच्या डोक्यावर आणि पाठीवर लोखंडी सळईने गंभीर वार केले. या भीषण हल्ल्यात आदिल गंभीर जखमी झाला असून, सुदैवाने दुचाकीचा अपघात न झाल्याने त्याचे प्राण वाचले. या वादाची पार्श्वभूमी जुन्या कौटुंबिक वादात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शकील शेख यांच्या मुलीने शाहिद नावाच्या तरुणाशी लग्न करण्यास नकार दिल्याने चिडलेल्या आरोपींनी यापूर्वीही त्यांच्या घरात घुसून मारहाण केली होती व घरातील दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती, ज्याची तक्रार मालवणी पोलीस ठाण्यात आधीच दाखल आहे. तसेच आरोपीवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत.
मात्र, या ताज्या प्राणघातक हल्ल्याबाबत कांदिवली पोलीस ठाण्यात दाद मागितली असता, पोलिसांनी केवळ अदखलपात्र (NC) गुन्हा नोंदवून आरोपींना पाठबळ दिल्याचा गंभीर आरोप शकील शेख यांनी केला आहे. पोलीस प्रशासन कुणाच्या दबावात आहे? असा प्रश्न शकील शेख यांनी उपस्थित केलेला आहे. पोलिसांनी जाणीवपूर्वक चुकीचा जबाब नोंदवून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबात भीतीचे वातावरण असून, आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करावा, सीसीटीव्ही फुटेज आणि सीडीआर तपासावा आणि आपल्या कुटुंबाला तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे, अशी विनंती शकील शेख यांनी गृहविभागाकडे केली आहे. तसेच, या प्रकरणात टाळाटाळ करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली असून, आता शासन यावर काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Post a Comment