मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 मुंबईत गुन्हा करून गोव्याच्या दिशेने पळणाऱ्या आरोपीला रायगड जिल्ह्यात अटक! गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) आणि पोलादपूर पोलिसांची मुंबई-गोवा हायवेवर धाडसी कारवाई... 🚨

खालापूरमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक!
 बनावट कंपनीच्या चौघांना अटक 

खालापूर, दि. १५ (प्रतिनिधी) :- भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे बनावट प्रमाणपत्र वापरून आणि गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून शेकडो नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा खालापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सावी कन्सलटन्सी इंटरप्रायझेस आणि स्वामीश कन्सलटन्सी प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या नावाखाली हा मोठा आर्थिक गैरव्यवहार सुरू होता. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत रविवारी चार मुख्य आरोपींना अटक केली असून, या घटनेमुळे संपूर्ण खालापूर परिसरात खळबळ माजली आहे.

​या प्रकरणाची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, आरोपींनी खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे चौक येथील शिवसेना शाखेसमोरील शॉप नंबर १ आणि २, तसेच खालापूर फाट्यावरील हरिओम इलेक्ट्रॉनिक इमारतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर आपली आलिशान कार्यालये थाटली होती. १ ऑगस्ट २०२४ पासून सुरू झालेला हा फसवणुकीचा खेळ ८ डिसेंबर २०२५ पर्यंत राजरोसपणे सुरू होता. आरोपींनी अतिशय नियोजनबद्ध रीतीने भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाकडून २ जून २०२२ रोजी 'उद्यम नोंदणी प्रमाणपत्र' मिळवले होते. वास्तविक, हे प्रमाणपत्र केवळ उद्योग नोंदणीसाठी असते, मात्र आरोपींनी या अधिकृत कागदपत्राचा गैरवापर करून सामान्य नागरिकांना असे भासवले की, त्यांच्या कंपनीला लोकांकडून ठेवी स्वीकारण्याचा कायदेशीर अधिकार आहे.

​जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी या टोळीने खालापूर आणि आसपासच्या परिसरात एजंट्स (दलाल) नियुक्त केले होते. या दलालांमार्फत 'सावी' आणि 'स्वामीश' कन्सलटन्सीच्या योजनांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्यात आला. कोणत्याही बँकेपेक्षा अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवताना आरोपींनी गुंतवणूकदारांना सांगितले की, १७ महिन्यांच्या कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास दरमहा ६ टक्के व्याज आणि मुळ गुंतवणुकीचे ६ टक्के असे मिळून एकूण १२ टक्के परतावा दिला जाईल. सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना वेळेवर परतावा देऊन त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला, जेणेकरून ते अधिक मोठी रक्कम गुंतवतील आणि इतर लोकांनाही या योजनेत ओढतील. गुंतवणुकीची हमी म्हणून त्यांनी गुंतवणूकदारांसोबत रीतसर सामंजस्य करार (MOU) देखील केले होते.

​मात्र, जेव्हा गुंतवणुकीचा आकडा मोठा झाला, तेव्हा आरोपींनी आपला खरा चेहरा दाखवण्यास सुरुवात केली. तक्रारदार फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांनी विश्वासाने गुंतवलेले १६ लाख ७५ हजार रुपये आणि अशाच प्रकारे शेकडो इतर गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये घेऊन आरोपींनी हात वर केले. गुंतवणूकदारांनी परताव्याची मागणी केली असता, त्यांना टाळाटाळ करण्यात आली आणि मूळ रक्कम देण्यासही नकार दिला गेला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने खालापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

​या गंभीर प्रकरणाची दखल घेत खालापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८(४), ३१६(२), ३१६(५), ३(५) यासह अनियमित ठेव योजनांवर बंदी कायदा २०१९ (BUDS Act) चे कलम ३, ४, ५, २१, २२, २३ आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण (MPID Act) कायदा १९९९ चे कलम ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करत असताना पोलिसांनी १३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १:५४ वाजता यातील चार प्रमुख आरोपींना अटक केली. या रॅकेटमध्ये अजून किती जणांचा समावेश आहे आणि फसवणुकीचा आकडा नक्की किती कोटींपर्यंत जातो, याचा सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे हे करत आहेत. या कारवाईमुळे बेकायदेशीर गुंतवणूक योजना राबवणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, नागरिकांनी कोणत्याही अधिकृत परवान्याशिवाय असलेल्या संस्थांमध्ये गुंतवणूक करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog