खालापुरात जमिनीच्या वादातून पेट्रोल पंपाची तोडफोड!
जेसीबीच्या साहाय्याने १ कोटींचे नुकसान
७ जणांवर गुन्हा दाखल
खालापूर, दि. १९ (प्रतिनिधी) :- खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कलोते रयती परिसरात जमिनीच्या जुन्या वादातून एका पेट्रोल पंपावर आणि ढाब्यावर भीषण हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई-पुणे जुन्या महामार्गालगत असलेल्या 'जय भोलेनाथ' ढाबा आणि पेट्रोल पंपावर आरोपींनी घातक शस्त्रांसह बेकायदेशीर जमाव जमवून मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली असून, यामध्ये सुमारे १ कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मौजे कलोते रयती येथील सर्व्हे नंबर ९० (हिस्सा नंबर १-२) आणि सर्व्हे नंबर ९१ (हिस्सा नंबर १) या जमिनीच्या मालकीहक्कावरून आणि ताब्यावरून फिर्यादी आणि आरोपींमध्ये दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. याच वादाचा राग मनात धरून, कुर्ला (पश्चिम) येथील नूर जहाँ कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या सात आरोपींनी कट रचून हा हल्ला केला.
आरोपींनी हातात घातक हत्यारे घेऊन बेकायदेशीर जमाव जमवला आणि फिर्यादी यांच्या मालकीच्या 'जय भोलेनाथ' ढाबा, पेट्रोल पंप आणि तेथील केबिनमध्ये अनधिकृतपणे प्रवेश केला. यावेळी आरोपींनी केवळ फिर्यादींना अश्लील शिवीगाळ केली नाही, तर त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण केली. या हिंसक कृत्यादरम्यान आरोपींनी चक्क जेसीबी आणि बुलडोझरसारख्या अवजड यंत्रसामग्रीचा वापर केला.
या यंत्रांच्या साहाय्याने पेट्रोल पंपामधील डिझेल डिस्पेंसिंग युनिट (डिझेल भरण्याचे मशीन), इलेक्ट्रिक पोल, विद्युत केबल आणि महत्त्वाची पाईप लाईन उखडून टाकली. इतकेच नव्हे तर 'जय भोले ऑटोमोबाईल'चा बोर्ड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा अधिकृत लोगो असलेला बोर्ड देखील पूर्णपणे तोडून फोडून टाकला. या संपूर्ण प्रकारात मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले असून फिर्यादींनी १ कोटी रुपयांची हानी झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
या गंभीर घटनेनंतर खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १५२/२०२६ नुसार आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १४३, १४४, १४७, १४९ (बेकायदेशीर जमाव आणि दंगल), ४५२ (विनापरवाना घरात शिरणे), ४२७ (नुकसान करणे), ५०४, ५०६ (शिवीगाळ व धमकी) तसेच शस्त्र अधिनियमाच्या कलम ४ आणि २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार गभाले यांच्याकडे सोपवण्यात आला असून, पोलीस या घटनेतील आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून जमिनीच्या वादातून होणाऱ्या गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Comments
Post a Comment