कल्याण-मुरबाड महामार्गावर काळाचा घाला
रायते पुलावर भीषण अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू
कल्याण, दि. १३ (मयुर धुमाळ) :- ठाणे जिल्ह्यातील कल्याण-मुरबाड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर आज सकाळी एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक घटना घडली. रायते गावाजवळील उल्हास नदीच्या पुलावर प्रवासी वाहतूक करणारी इको व्हॅन आणि सिमेंट मिक्सर यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत तब्बल ११ जणांचा मृत्यू झाला आहे. आज, १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८:३० च्या सुमारास हा अपघात झाला. प्रवासी व्हॅन मुरबाडहून कल्याणच्या दिशेने जात असताना हा अपघात इतका भीषण होता की, धडकेमुळे व्हॅनचा अक्षरशः चक्काचूर झाला असून त्यात प्रवास करणाऱ्या ८ पुरुष आणि ३ महिलांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे आणि कॉंक्रिटीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू असल्यामुळे या मार्गावरील वाहनांचा वेग वाढला आहे, मात्र अनेकदा वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने अपघातांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. या मार्गावर धावणाऱ्या प्रवासी व्हॅनमध्ये अनेकदा क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले जात असल्याचेही समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासनाने तातडीने मदतीसाठी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनातून मृतदेह बाहेर काढून ते शवविच्छेदनासाठी गोवेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहेत.
या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या ११ जणांपैकी ९ व्यक्तींची ओळख आतापर्यंत पटली असून, मृतांमध्ये मुरबाड तहसीलदार कार्यालयातील महसूल सहाय्यक भूषण घोरपडे यांच्यासह देवगाव, टेंभरे, साखरे, नारायणगाव आणि कल्याण येथील रहिवाशांचा समावेश आहे. मृतांमध्ये स्नेहा, मानसी आणि प्रथमेश मोहपे या एकाच कुटुंबातील तरुण सदस्यांचाही समावेश असल्याचे समजते. उर्वरित दोन मृतांची ओळख पटवण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू असून या घटनेमुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

Comments
Post a Comment