दोन वर्षांपासून गुंगारा देणारा फरार आरोपी रत्नागिरी पोलिसांच्या जाळ्यात
RAIDS ॲपची किमया
रत्नागिरी, दि. १७ (प्रतिनिधी) :- रत्नागिरी जिल्ह्यात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि फरार गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात सन २०२२ मध्ये दाखल झालेल्या एका गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाला मोठे यश आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या आरोपीला राजस्थानातील जोधपूर येथून अत्यंत शिताफीने ताब्यात घेण्यात आले. या संपूर्ण कारवाईत महाराष्ट्र पोलिसांच्या 'RAIDS' (Real-time Analysis and Information Dissemination System) या अत्याधुनिक ॲप्लिकेशनची भूमिका अत्यंत कळीची ठरली आहे.
सदर प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १९६/२०२२ अन्वये गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित आरोपी फरार होता. पोलीस त्याचा सातत्याने शोध घेत होते, मात्र तो वारंवार आपले ठिकाण बदलत असल्याने पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तंत्रज्ञानाची जोड घेत या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र केला. पोलिसांनी आरोपीचे २०२२ मधील जुने छायाचित्र 'RAIDS' ॲपमध्ये अपलोड केले. या ॲपच्या विशेष फिचरचा वापर करून त्या छायाचित्राचे विविध कोनांतून आणि स्वरूपात 'फेस रीकन्स्ट्रक्शन' करण्यात आले. यामुळे आरोपीच्या चेहऱ्यात काळाप्रमाणे झालेले संभाव्य बदल ओळखून त्याचे रेखाचित्र तयार करणे पोलिसांना सोपे झाले.
केवळ तंत्रज्ञानावर विसंबून न राहता, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि आपल्या गोपनीय खबऱ्यांचे जाळे देखील सक्रिय केले होते. फेस रीकन्स्ट्रक्शनद्वारे मिळालेली माहिती आणि तांत्रिक तपासातून समोर आलेले धागेदोरे जुळवत असताना, सदर आरोपी राजस्थानमधील जोधपूर येथे लपून बसल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे तात्काळ एक विशेष पथक जोधपूरला रवाना झाले आणि तिथून आरोपीला अटक करण्यात आली. ही कारवाई रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे व त्यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने ही मोहीम राबवून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या यशामुळे गुन्हेगारांमध्ये धडकी भरली असून, तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलीस आता जुन्यात जुन्या गुन्ह्यांचा छडा लावण्यास सक्षम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Comments
Post a Comment