दिवेआगरमध्ये पर्यटकांचा राडा
आवाज कमी करण्यास सांगितल्याने ग्रामस्थांना बेदम मारहाण
दिवेआगर-श्रीवर्धन, दि. ९ (प्रतिनिधी) :- कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या दिवेआगर येथे एका रिसोर्टसमोर गाणी वाजवण्याच्या कारणावरून स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटकांमध्ये जोरदार राडा झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मौजे दिवेआगर येथील ॲप्सॉन रिसोर्टसमोर ही घटना घडली असून, आवाजाची मर्यादा राखण्यास सांगितल्याचा राग मनात धरून ११ पर्यटकांनी मिळून स्थानिक फिर्यादी आणि त्यांच्यासोबत असलेल्या साक्षीदाराला बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी दिघी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, ७ एप्रिल २०२६ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास हनुमान पाखाडी येथील रहिवासी असलेले फिर्यादी आणि त्यांचे मित्र (साक्षीदार) हे दिवेआगर येथून आपापल्या घरी पायी जात होते. ते ॲप्सॉन रिसोर्टसमोर आले असता, रिसोर्टमध्ये असलेल्या पर्यटकांचा मोठ्या आवाजात गोंधळ सुरू होता. रात्रीची वेळ असल्याने फिर्यादी यांनी सौजन्याने सदर पर्यटकांना आवाजाची तीव्रता कमी करण्याची विनंती केली. मात्र, आपली चूक सुधारण्याऐवजी पर्यटकांनी फिर्यादींशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. आवाजाबाबत टोकल्याचा राग मनात धरून रिसोर्टमधील सर्व ११ आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवला आणि फिर्यादींना घेरले.
काही क्षणातच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. जमावाने फिर्यादी आणि साक्षीदाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपींनी केवळ मारहाणच केली नाही, तर अत्यंत अर्वाच्च भाषेत आई-बहिणीवरून शिवीगाळ करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीदरम्यान एका आरोपीने कोणत्यातरी जड वस्तूने फिर्यादीच्या उजव्या डोळ्यावर जोरात प्रहार केला, ज्यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले आहेत. संतापजनक बाब म्हणजे, मारहाण करणाऱ्यांपैकी एका आरोपीने स्वतःजवळील कोयता काढून फिर्यादी आणि साक्षीदाराला जीवे मारण्याची धमकी दिली, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
या घटनेनंतर पीडितांनी तत्काळ दिघी सागरी पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत ११ आरोपींविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर २०/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७(३)/१३५ सह भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १८९(२), १८९(४), १९०, १९१(२), ११८(१), ११५(२) आणि ३५२ अंतर्गत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे दिवेआगरमधील स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत असून पर्यटकांच्या वाढत्या अरेरावीवर नियंत्रण आणण्याची मागणी होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अर्शद शेख हे करत असून, आरोपींचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Comments
Post a Comment