मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 मुंबईत गुन्हा करून गोव्याच्या दिशेने पळणाऱ्या आरोपीला रायगड जिल्ह्यात अटक! गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) आणि पोलादपूर पोलिसांची मुंबई-गोवा हायवेवर धाडसी कारवाई... 🚨

श्रीवर्धन तालुक्यात किरकोळ कारणावरून दोघांना मारहाण
नऊ जणांवर गुन्हा दाखल
 पर्यटकांची गुंडगिरी वाढली? 


श्रीवर्धन, दि. १४ (प्रतिनिधी) :- मुंबईला जाण्यासाठी निघालेल्या दोघांना किरकोळ कारणावरून अडवून नऊ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना श्रीवर्धन तालुक्यातील गोँडघर येथील एच. पी. पेट्रोल पंपाजवळ घडली आहे. याप्रकरणी दिघी सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. काहीच दिवसांपूर्वी दिवेआगर येथे देखील पर्यटकांनी स्थानिकांना मारहाण केल्याचा प्रकार घडला होता, तसेच यापूर्वी देखील रायगड जिल्ह्यात स्थानिकांसमोर पर्यटकांच्या अरेरावीचे प्रकार घडलेले असल्यामुळे रायगड जिल्ह्यात पर्यटकांची गुडगिरी वाढलीय का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसमोर उभा राहिलेला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, वडवली येथील रहिवासी फिर्यादी हे त्यांच्या मित्रासोबत स्वतःच्या कारने मुंबईला जाण्यासाठी निघाले होते. सोमवारी सकाळी ९:१५ च्या सुमारास ते डिझेल भरण्यासाठी गोँडघर येथील पेट्रोल पंपावर पोहचले. मात्र, पंपाच्या कोपऱ्यावर असलेल्या एका चहाच्या टपरीसमोर टोयोटा ग्लान्झा कार (क्र. MH 14 LY 3383) रस्त्यात उभी असल्याने त्यांना आपली कार पुढे नेता येत नव्हती. त्यामुळे फिर्यादी यांनी टपरीवर उभ्या असलेल्या तरुणांना कार बाजूला घेण्याची विनंती केली. या साध्या विनंतीचा राग धरून तेथे उपस्थित असलेल्या चार तरुणांनी फिर्यादी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि या तरुणांनी किर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

​यावेळी फिर्यादी यांना यांना वाचवण्यासाठी त्यांचे इतर दोन मित्र मध्यस्थी करण्यासाठी आले असता, त्यांनाही या टोळक्याने मारहाण केली. आरोपींपैकी एकाने चहाच्या टपरीवरील प्लास्टिकचे स्टूल उचलून घराडे यांच्या पाठीवर जोरात मारले. इतक्यात पाठीमागून हुंडई ग्रँड आय-१० कार (क्र. MH 14 KW 8631) मधून आणखी पाच तरुण तेथे आले आणि त्यांनीही काहीही विचारणा न करता फिर्यादी व त्यांच्या मित्रांना बेदम मारहाण केली. या भीषण हाणामारीत फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चेनही गहाळ झाली आहे.

​या प्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ओंकार आनंदा शिवळे, वेदांत संतोष शिवळे, अभिषेक रवींद्र शिवळे, संकेत दत्तात्रय आंद्रे, तेजस लालाजी पठारे, स्वयंम ज्ञानेश्वर नाणेकर, अभिषेक कैलास येळवंडे, गौरव नवनाथ येळवंडे आणि गौरव मुरलीधर येळवंडे या नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व आरोपी पुणे जिल्ह्यातील खेड आणि चाकण परिसरातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मेंदडकर करत आहेत. एका साध्या वादातून पर्यटनासाठी किंवा अन्य कारणाने आलेल्या युवकांनी स्थानिक प्रवाशांवर केलेल्या या हल्ल्यामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.

Comments

Popular posts from this blog