अलिबाग : जास्त नफ्याचे आमिष दाखवून बेलोशी येथील व्यक्तीची ६ लाखांची ऑनलाईन फसवणूक
अलिबाग, दि. १३ (प्रतिनिधी) :- सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवून आणि जादा नफ्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य नागरिकांना लुटण्याचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. अशीच एक धक्कादायक घटना रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली असून, बेलोशी येथील एका व्यक्तीला तब्बल ६ लाख १६ हजार ११३ रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. सायबर चोरट्यांनी अतिशय चलाखीने फेसबुक आणि व्हॉट्सअॅपचा वापर करून हा आर्थिक फसवणुकीचा जाळा विणला असल्याचे समोर आले आहे.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार फिर्यादी हे अलिबाग तालुक्यातील बेलोशी (पो. मल्याण) येथील रहिवासी आहेत. २९ मार्च २०२६ रोजी रात्री ८:५१ वाजल्यापासून ते ७ एप्रिल २०२६ रोजी रात्री ८:५१ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही फसवणुकीची मालिका सुरू होती. एका अनोळखी महिला आरोपीने प्रथम फेसबुकच्या माध्यमातून फिर्यादी यांच्याशी मैत्री केली. फेसबुकवर संवाद वाढल्यानंतर आरोपीने फिर्यादी यांचा मोबाईल क्रमांक मिळवला आणि त्यानंतर व्हॉट्सअॅपवर चॅटिंग तसेच व्हॉईस कॉलिंगद्वारे संपर्क सुरू ठेवला. काही दिवसांतच आरोपीने फिर्यादी यांचा पूर्ण विश्वास संपादन केला.
फिर्यादी यांचा विश्वास संपादन केल्यानंतर, आरोपीने त्यांना एका योजनेत गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक नफा मिळेल, असे मोहक आमिष दाखवले. नफ्याच्या आमिषाला बळी पडून फिर्यादी गुंतवणूक करण्यास तयार झाले. त्यानंतर आरोपीने त्यांच्या मोबाईलवर एक संशयास्पद लिंक पाठवली आणि त्या लिंकद्वारे व्यवहार करण्यास सांगितले. या लिंकचा वापर करून आरोपीने फिर्यादींकडून वेळोवेळी युपीआय (UPI) द्वारे ऑनलाईन रकमा स्वीकारल्या. अशा प्रकारे तुकड्या-तुकड्याने एकूण ६,१६,११३.४० रुपये फिर्यादी यांनी आरोपीच्या खात्यावर वर्ग केले. मात्र, गुंतवणूक केल्यानंतर कोणताही परतावा न मिळाल्याने आणि समोरून प्रतिसाद मिळणे बंद झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले.
आपली आर्थिक फसवणूक आणि विश्वासघात झाल्याचे समजताच फिर्यादी यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून रेवदंडा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर ४६/२०२६ नुसार, माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० (२००८ च्या सुधारणेसह) कलम ६६ (d) आणि भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक श्री. परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास अत्यंत वेगाने सुरू करण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीने सोशल मीडियावर दिलेल्या आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन या निमित्ताने पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment