११ गोवंशीय जनावरांची सुटका; २ लाख ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त!
अहिल्यानगर पोलिसांची कारवाई
अहिल्यानगर वृत्त (रणजीत मस्के) :- जिल्ह्यात गोवंशीय जनावरांची बेकायदा कत्तल करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने २३ एप्रिल २०२६ रोजी कर्जत आणि राहुरी पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे आणि त्यांच्या पथकाने दोन स्वतंत्र पथके तयार करून कत्तलखान्यांची माहिती काढली होती.
या मोहिमेत राशिन (ता. कर्जत) आणि राहुरी येथे छापे टाकले असता, कत्तलीसाठी अत्यंत निर्दयतेने डांबून ठेवलेली एकूण ११ गोवंशीय जनावरे आढळून आली. कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील कारवाईत सोहेल राजू कुरेशी याच्याकडून ६० हजार रुपये किमतीची ४ जनावरे जप्त करण्यात आली, तर राहुरी येथील कारवाईत शाहरुख सुलतान कुरेशी आणि मुक्तार मुश्ताक कुरेशी यांच्याकडून ६३ हजार रुपयांची ७ जनावरे व १ लाख ६० हजार रुपये किमतीची दोन वाहने असा एकूण २ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण २ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून तिन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम आणि प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याच्या कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या तिन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेने ही यशस्वी कामगिरी केली असून, यापुढेही जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध अशीच कडक कारवाई सुरू राहील, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment