जळगाव : घरगुती वस्तू संचासाठी १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
४१ हजारांची रोकड जप्त
जळगाव (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र शासन कामगार विभाग आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ, मुंबई यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी योजनेला भ्रष्टाचाराची कीड लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासनाच्या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारा 'गृह उपयोगी वस्तूंचा संच' देण्यासाठी १०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या आसमा परवीन शेख इरफान या महिला कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. विशेष म्हणजे, या कारवाईत आरोपी महिलेच्या ताब्यातील पत्र्याच्या पेटीतून तब्बल ४१,२५० रुपयांची संशयास्पद रोकड हस्तगत करण्यात आली असून, यामुळे या योजनेत मोठ्या प्रमाणावर वसुली सुरू असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.
या प्रकरणातील सविस्तर वृत्त असे की, मूळ तक्रारदार हे जळगाव येथील रहिवासी असून त्यांनी कामगार विभागाच्या गृह उपयोगी संच योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. या नोंदणीनुसार जळगाव जिल्ह्यातील चिंचोली येथे हा संच ताब्यात घेण्यासाठी हजर राहण्याबाबतचे पत्र प्राप्त झाले होते. शासनाकडून मिळणारी ही मदत घेण्यासाठी तक्रारदार चिंचोली येथील वितरण केंद्रावर पोहचले. तिथे त्यांनी सुरुवातीला तबस्सुम शेख यांची भेट घेतली असता, त्यांनी पुढील प्रक्रियेसाठी आसमा परवीन शेख इरफान (वय ३८, रा. शिवाजी नगर, जळगाव) यांची भेट घेण्यास सांगितले.
तक्रारदार जेव्हा आसमा शेख यांना भेटले, तेव्हा त्यांनी या वस्तूंचा संच मिळवण्यासाठी तुमची 'केवायसी' (KYC) करणे आवश्यक असल्याचे सांगितले. मात्र, ही शासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याच्या मोबदल्यात त्यांनी तक्रारदाराकडे १०० रुपयांच्या लाचेची मागणी केली. हक्काच्या वस्तू मिळवण्यासाठी लाच द्यावी लागत असल्याने तक्रारदाराने तातडीने या प्रकाराबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्याकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली.
या तक्रारीची दखल घेत एसीबीच्या पथकाने चिंचोली येथील वितरण केंद्रावर सापळा रचला. पडताळणी दरम्यान, आरोपी आसमा शेख यांनी तक्रारदाराकडून पंचसाक्षीदारांसमोर १०० रुपयांची लाच मागून ती स्वीकारली. लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्यांना जागीच ताब्यात घेतले. त्यानंतर केलेल्या झडतीमध्ये आरोपी महिला बसत असलेल्या टेबलाखालील एका पत्र्याच्या पेटीत ४१,२५० रुपयांची रोख रक्कम आढळून आली. ही रक्कम लाभार्थ्यांकडून केवायसी करण्याच्या नावाखाली लाच म्हणून गोळा करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. यामध्ये ५००, २००, १०० आणि ५० रुपयांच्या नोटांचा समावेश होता.
ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगावचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेश्मा चंद्रकांत अवतारे, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे आणि त्यांच्या पथकातील सुरेश पाटील, बाळू मराठे, राकेश दुसाने व प्रदीप पोळ यांनी केली. या प्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन, जळगाव येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे सरकारी योजनांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, गरीबांच्या हक्काच्या साहित्यासाठी पैसे मागणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Comments
Post a Comment