मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाची गरुडझेप

 राज्यात पाचवा क्रमांक 
रत्नागिरी, दि. २९ (प्रतिनिधी) :- राज्य शासनाकडून राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या विशेष ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने अत्यंत प्रभावी कामगिरी नोंदवली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा कल्पक वापर आणि प्रशासकीय कामात आणलेली पारदर्शकता यांच्या जोरावर रत्नागिरी जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच पाचवा क्रमांक पटकावण्याचा बहुमान मिळवला आहे. या यशाबद्दल रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मुंबई येथे आयोजित एका विशेष सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यात तंत्रज्ञानाचा पोलीस दलातील प्रभावी वापर, त्या माध्यमातून राखलेली चोख कायदा व सुव्यवस्था, तसेच राबविण्यात आलेले विविध नागरिकाभिमुख उपक्रम यांची दखल शासन स्तरावर घेण्यात आली आहे. या प्रसंगी राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्याचे मुख्य सचिव श्री. राजेश अग्रवाल आणि पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांसह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्य शासनाने या मूल्यमापनासाठी सात प्रमुख निकष निश्चित केले होते. यामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ, आपले सरकार प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी, प्रशासकीय कामकाजातील वेग वाढवणारी 'ई-ऑफिस' यंत्रणा आणि कामाचा आढावा घेण्यासाठी तयार केलेला विशेष डॅशबोर्ड यांचा समावेश होता. यासोबतच आधुनिक युगाची पावले ओळखून व्हॉट्सअप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी भौगोलिक माहिती प्रणालीचा (GIS) केलेला अवलंब या घटकांवर कार्यालयांचे गुणदान करण्यात आले.

राज्यातील एकूण ३४ सर्वोत्तम पोलीस अधीक्षक कार्यालयांमध्ये या ई-गव्हर्नन्स उपक्रमांतर्गत चुरस पाहायला मिळाली. या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाने २०० पैकी १४४.२५ इतके गुण मिळवत आपली मोहोर उमटवली. पोलीस दलातील या डिजिटल क्रांतीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मिळणाऱ्या सेवा अधिक सुलभ आणि वेगवान झाल्या असून, प्रशासकीय कामात मोठी सुसूत्रता आली आहे. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी पोलीस दलाने मिळवलेले हे यश जिल्ह्यासाठी अभिमानास्पद मानले जात आहे.

Comments

Popular posts from this blog