अखिल भारतीय पोलीस टी-२० क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलाचा ऐतिहासिक विजय
आरपीएफवर मात करत पटकावले विजेतेपद
दिल्ली विशेष वृत्त (रणजीत मस्के) :- दिल्लीतील प्रतिष्ठित अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या 'दुसऱ्या ऑल इंडिया पोलीस टी-२० क्रिकेट' (2nd All India Police T-20 Cricket Match) स्पर्धेत महाराष्ट्र राज्य पोलीस संघाने विजेतेपद पटकावले. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) संघाचा पराभव करून चषक आपल्या नावावर केला.
अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय सार्थ ठरवत महाराष्ट्र पोलीस संघाने निर्धारित २० षटकांत २५१ धावांचा प्रचंड डोंगर उभा केला. या डावात महाराष्ट्राच्या फलंदाजांनी मैदानावर अक्षरशः चौफेर फटकेबाजी केली. कर्णधार सुनील पाटील, रोहित पोळ, योगेश पाटील आणि श्रीकांत लिंबोळे यांनी मोलाची साथ दिली.
२५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरपीएफच्या संघाने डावाची सुरुवात आश्वासक केली होती, मात्र रोहित बेहेरे याने भेदक मारा करत आरपीएफच्या फलंदाजीला खिंडार पाडले. बेहेरेने महत्त्वपूर्ण पाच बळी घेतले.
संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या सुनील पाटील याला 'मालिकावीर' म्हणून गौरवण्यात आले, तर रोहित बेहेरे 'सामनावीर' ठरला. महाराष्ट्र पोलीस संघाच्या या यशाबद्दल पोलीस महासंचालक सदानंद दाते व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

Comments
Post a Comment