सातारा : मायणी पोलीसांची मोठी कामगिरी
लॉकडाऊनमध्ये बेपत्ता झालेला मुलगा अखेर कुटूंबियांच्या ताब्यात
सातारा वृत्त (रणजीत मस्के) :- सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मायणी येथे १५ मार्च २०२६ रोजी यात्रा होती. यात्रेमध्ये सात वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला सचिन पवार हा १४ वर्षीय मुलगा पोलीसांना मिळून आला. मायणी पोलीस दूरक्षेत्राच्या पथकाने अत्यंत चिकाटीने तपास करत या मुलाचा शोध लावून त्याला त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे.
सचिनला केवळ स्वतःचे नाव आणि गाव विजापूर असल्याचे आठवत होते, मात्र पत्ता सांगता येत नव्हता. सहायय्क पोलीस निरीक्षक विक्रांत पाटील यांनी विजापूर पोलीसांशी संपर्क साधला, परंतु सुरुवातीला कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीने पोलीसांचे एक पथक विजापूरला रवाना झाले. तेथील स्थानिक पोलीस आणि बंजारा समाजाचे समाजसेवक कैलास यांच्या मदतीने व्हॉट्सअॅप ग्रुपवर मुलाचा फोटो प्रसारित करण्यात आला. या प्रयत्नांना यश आले आणि हा मुलगा विजापूरमधील एका तांड्यावरील तिप्पण्णा किसन पवार यांचा असल्याचे निष्पन्न झाले.
पोलीसांनी तातडीने मुलाच्या वडिलांशी संपर्क साधला असता, त्यांनी तो आपलाच मुलगा असल्याचे ओळखले. चौकशीत असे समोर आले की, सन २०२० मध्ये लॉकडाऊनच्या काळात सचिनची आई आपल्या दोन मुलांसह घर सोडून निघून गेली होती, जी पुन्हा परतलीच नाही. कोरोनाच्या संकटामुळे त्यावेळी कुटुंबीयांनी कोठेही तक्रार दिली नव्हती. तब्बल सात वर्षांनंतर सचिनची भेट झाल्याने वडील, आजी आणि चुलत्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. ही कौतुकास्पद कामगिरी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत पाटील व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.



Comments
Post a Comment