खारेगाव टोलनाक्याजवळ खाद्यतेलाच्या नावाखाली बेकायदेशीर डिझेलची वाहतूक करणारा टँकर जप्त!
४६.५ लाखांच्या मुद्देमालासह आंतरराज्य तस्कर राजू पंडित टोळीच्या जुन्या गुन्ह्यांची पाळेमुळे आली समोर
ठाणे, दि. २८ (प्रतिनिधी) :- मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाक्याजवळ ठाणे शहर गुन्हे शाखा घटक-१ आणि शिधावाटप विभागाच्या संयुक्त पथकाने एक मोठी आणि धाडसी कारवाई केली आहे. खाद्यतेलाच्या नावाखाली बेकायदेशीररीत्या डिझेल सदृश ज्वलनशील पदार्थाची वाहतूक करणारा एक मोठा टँकर या पथकाने जप्त केला असून, या कारवाईत तब्बल ४६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. लोकांना फसवण्यासाठी संबंधित टँकरवर 'ईडीबल ऑईल' असे लिहिण्यात आले होते. गुन्हे शाखा घटक-१ ला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे खारेगाव टोलनाक्याच्या अगोदर, मुंब्रा वळण रस्त्याजवळ सापळा रचून संशयास्पद टाटा कंपनीचा टँकर क्रमांक MH-46-BB-7134 थांबवून त्याची तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणात ज्वलनशील द्रव पदार्थ आढळून आला. टँकर चालकाकडे या डिझेल सदृश पदार्थाची वाहतूक करण्याचा कोणताही परवाना, खरेदी बिल किंवा वैध कागदपत्रे नव्हती. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून उपनियंत्रक शिधावाटप विभाग, ठाणे यांच्या आदेशानुसार शिधावाटप अधिकारी श्री. सुभाष रामनाथ डुंबरे व त्यांच्या पथकाला तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या संयुक्त तपासणीत टँकरच्या ५ कप्प्यांमध्ये एकूण २४ लाख ५० हजार रुपये किमतीचे २५,००० लिटर बेकायदेशीर डिझेल सदृश पेट्रोलियम पदार्थ आणि २२ लाख रुपये किमतीचा टाटा टँकर असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नियमानुसार तपासणी अधिकाऱ्यांनी रासायनिक चाचणीसाठी नमुने गोळा केले असून, टँकर पोलिसांच्या स्वाधीन केला आहे.
प्राथमिक तपासणीत आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संगनमत करून विरार खाडीच्या किनारी बोटीमधून आणलेले डिझेल टँकरमध्ये भरले होते आणि ते नाशिकच्या दिशेने घेऊन जाण्याचा त्यांचा बेत होता. पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करण्याचे कोणतेही वैध मापदंड न पाळता सामान्य टँकरमधून अशी धोकादायक वाहतूक करून नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण केल्याप्रकरणी मुख्य आरोपी चालक धर्मेंद्रकुमार श्यामलाल पटेल, वय ३७ वर्षे, राहणार वाशी, नवी मुंबई याला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात टँकर मालक रितेश अभय नारायण सिंग, राहणार दिवा, ठाणे याच्यासह पालघर व सुरत येथील रोशन शिरोडकर, नितीन कोली, दीपक पवार, सागर पाटील, अनिल सुरत आणि राजकिशोर दास उर्फ राजू पंडित यांच्यासह एकूण ८ जणांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५, मोटार स्पीरीट अँड हायस्पीड डिझेल ऑर्डर २००५ आणि बायोडिझेल धोरण २०२१ च्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस निरीक्षक अशोक रावजी उतेकर या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
या कारवाईच्या निमित्ताने मूळचा उडीसाचा रहिवासी असलेला आणि सध्या घोडपदेव, मुंबई येथे राहणारा या टोळीचा मुख्य सूत्रधार राजकिशोर दास पंडित उर्फ राजू पंडित याच्या डिझेल तस्करीच्या मोठ्या काळ्या साम्राज्याचा पर्दाफाश झाला आहे. राजू पंडित हा अनेक वर्षांपासून मुंबई आणि रायगड जिल्ह्यात जहाज कॅप्टन व काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून बेकायदेशीर डिझेल तस्करीचे मोठे जाळे चालवत आहे. या व्यक्तीवर यापूर्वी मुंबईत मोका (MCOCA) अंतर्गत अत्यंत कडक कारवाई झाली असून, त्याच्याविरुद्ध मुंबई डीसीबीमध्ये २०१५ चा गुन्हा क्रमांक ६५ आणि २०१६ चा गुन्हा क्रमांक ६५, तसेच येलो गेट पोलीस ठाण्यात २०१८ चा गुन्हा क्रमांक २, २०१९ चा गुन्हा क्रमांक २० आणि २०२३ चा गुन्हा क्रमांक २२४ असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. जामिनावर सुटल्यावरही त्याने रायगड जिल्ह्यातील काही स्थानिक अधिकारी व राजकीय व्यक्तींशी संगनमत करून पुन्हा डिझेल तस्करी सुरू ठेवली होती. त्याच्याविरुद्ध रायगड जिल्ह्यातील रेवदंडा पोलीस ठाण्यात २०२३ चा गुन्हा क्रमांक १७४, पेण-दादरी पोलीस ठाण्यात २०२३ चा गुन्हा क्रमांक ८९ आणि पेण पोलीस ठाण्यात २०२५ चा गुन्हा क्रमांक ०००२ अशी गुन्हेगारी पार्श्वभूमी उघड झाली आहे.
या सर्व प्रकरणांमध्ये राजू पंडित व त्याच्या टोळीचा सक्रिय सहभाग असून तो अल्पावधीतच जामिनावर सुटून पुन्हा याच धंद्यात गुंतत असल्यामुळे आता पोलीस महासंचालकांकडे एका जागरूक नागरिकाने तक्रार करून त्याच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. या मागणीनुसार राजू पंडित व त्याच्या कुटुंबियांची मुंबई, उडीसा आणि रायगड जिल्ह्यातील खालापूर परिसरातील मालमत्ता, बँक खाती, 'दास' नावाने चालविल्या जाणाऱ्या एजन्सी, तस्करीतून झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांचा मागोवा, त्याच्या कडील महागड्या गाड्या, घड्याळे, दागिने आणि त्याचे मुंबईतील काही राजकीय नेत्यांशी असलेले संबंध उघडकीस आणणे अत्यंत आवश्यक झाले आहे. या प्रकारच्या तस्करीमुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून, स्थानिक भागात भयाचे वातावरण निर्माण होत आहे. दरम्यान, या मोठ्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव मस्के-पाटील यांनी जिल्ह्यात डिझेल व तत्सम इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे, तसेच अवैध वाहतूक करणाऱ्याविरुद्ध प्रशासन अत्यंत कडक कायदेशीर कारवाई करेल असा इशाराही दिला आहे.

Comments
Post a Comment